

वर्धाः शहरी व ग्रामीण भागात चांगले खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी राज्य शासनाचे क्रीडा धोरण अंमलात आणले आहे. शहरी व ग्रामीण भागात व्यायाम शाळा निर्माण करण्यासाठी यापूर्वी ७ लाख रूपयांचे अनुदान देण्यात येत होते. परंतु शासनाने आत यात भरघोस अशी वाढ केली असून आता १४ लाख रूपये अनुदान दिल्या जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रसार व खेळाडूंना चालना मिळावी तसेच त्यांच्या आरोग्य यासाठी क्रीडा धोरण २०१२ अंमलात आले आहे. यापूर्वी व्यायाम शाळेसाठी दोन लक्ष रूपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र सन २०१९ मध्ये राज्य शासनाने यात वाढ करून अनुदानाची रक्कम ७ लाख रूपये केली होती. परंतु व्यायाम शाळेत विविध साहित्यांची वाढती मागणी व दरामध्ये वाढ झाल्याने सदर अनुदान कमी पडत होते.
तथापि, अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेऊन राज्य सरकारने अनुदानाची रक्कम ७ लाख रुपयांवरून १४ लाख रूपये केली आहे. तसा शासन आदेश २३ एप्रिल २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण, गृह ग्रामीण, खनिकर्म, गृहनिर्माण, सहकार राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली. खेळाडू व व्यायाम शाळांनी या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या दर्जाच्या व्यायाम शाळा निर्माण कराव्या. तसेच खेळासाठी पोषक असे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे.