

electric pole lightning strike
उमरगा : शहर व परिसरात सोमवारी, (दि १२) दुपारी अडीच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. तर येणेगूर (ता. उमरगा) येथे उच्च दाबाच्या विद्युत खांबावर वीज पडून विज वाहक तार तुटून तिघेजण जखमी झाले.
शहर व तालुक्यात सकाळ पासून अधून मधून ढगाळ वातावरण व उष्णता होती. दुपारी अडीचच्या सुमारास वादळी वारे आणि मेघगर्जेसह अवकाळी पाऊस झाला. तालुक्यातील येणेगूर बसस्थानकासमोरील रिक्षा थांब्याच्या बाजूने गेलेल्या ११ के व्ही विद्युत वाहिनीच्या खांबावर वीज पडली. यावरील विद्युत प्रवाह चालू असलेली एक तार तुटुन बाजूला थांबलेल्या (एम एच २५ ई ९७९५) रिक्षावर पडली.
रिक्षातील गोविंद एकनाथ भुरे (वय ५५), अनुसया सिद्राम माने (वय ६०) व प्रांजली गुरुनाथ कांबळे (वय ११) तिघेही रा. तुगाव ता. उमरगा जखमी झाले. जखमीवर येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी उमरगा येथे दाखल करण्यात आले आहे. यात एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. रिक्षातील इतर चार पाच जण होते. यापैकी कोणालाही इजा झाली नाही. तार तुटून पडल्याने रिक्षाने पेट घेतला.
यात रिक्षाची टायर जळून खाक झाली आहेत. तर बाजुला उभा असलेल्या (एम एच २५ एफ ७५९) रिक्षाचेही नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ आग विझवली. येथील आठवडी बाजारात परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. तार तुटलेल्या ठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र वर्दळ कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील येणेगूर येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. बाजारात भाजीपाला, फळे तसेच विविध वस्तू व साहित्य विक्रीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी आणि व्यापा-यांनी छोटे छोटे स्टॉल लावले होते. दुपारी अडीचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बाजारात एकच तारांबळ उडाली. अचानक झालेल्या पावसामुळे विक्रीसाठी ठेवलेला भाजीपाला, फळे व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले.