Pankaj Bhoyar|धामनदी तीरावर पर्यंटकांसाठी विशेष सुविधा निर्माण करणार
वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या पवनार येथील धाम नदी परीसरातील कामांची दुरस्ती करावी. पवनार येथे येणाऱ्या पर्यंटकांना सोईसुविधा निर्माण करुन देण्यासाठी झालेल्या कामांची दुरुस्ती करण्यासोबतच विद्युतीकरणाची कामे तत्काळ करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी रविवारी (दि.२४) केल्या.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत पवनार येथील धाम नदी काठावर करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतिश अंभोरे, उप अभियंता महेश मोकलकर, सेवाग्राम विकास आराखड्याचे प्रकल्प व्यवस्थापक वसीम खान आदी उपस्थित होते.
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांसाठी २४४ कोटी ८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून झालेल्या कामांची देखभाल दुरुस्तीची व नुतनीकरणाची कामे तात्काळ पूर्ण करावी. पवनार येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्यामुळे नदीकाठावरील सौदर्यीकरणाच्या कामाची स्वच्छता व दुरुतीच्या कामासोबतच विद्युतीकरणाची कामे तात्काळ पूर्ण करावी, नागरिकांसाठी बांधण्यात आलेले प्रसाधनगृह सुरु करण्याच्याही सूचना यावेळी डॉ.पंकज भोयर यांनी केल्या. तसेच काठावरील संरक्षण भितींची उंची वाढविण्याच्याही सूचना यावेळी त्यांनी केल्या.
पवनार आश्रम येथे येणाऱ्या पर्यंटकांना नदीतील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता यावा यासाठी तीरावर बसण्यासाठी आसन सुविधा निर्माण करुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. सौदर्यीकरणाच्या झालेल्या कामांच्या देखभाल दुरुस्तीची स्वसहमताने जबाबदारी स्विकारलेल्या संस्था व उद्योजकांकडून चांगल्या प्रकारचे देखभाल करण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

