

वर्धा : शेती आणि शेतकरी राज्य शासनाचे अतिशय प्राधान्याचे क्षेत्र आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वीज बिलाचा मोठा भार सहन करावा लागतो. या भारातून त्यांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना शासनाने सुरु केली. या योजनेतून जिल्ह्यातील 82 हजार शेतकऱ्यांचे आतापर्यंत 91 कोटींचे वीज बील माफ करण्यात आले आहे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी शासनाच्या विविध विकासकामांचा आढावा सादर केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्ध्याच्या भूमीतून स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांना नमन करून त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
जिल्ह्याच्या विकासाचा चौफेर आढावा
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी आपल्या भाषणात आरोग्य, शिक्षण, सिंचन आणि रोजगार या क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण योजनांची माहिती दिली. 'मोतिबिंदू विरहीत वर्धा' अभियानांतर्गत ३२ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करून ४ हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. तसेच, जिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे क्रिटिकल केअर ब्लॉक आणि १८ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ८ शाळा 'आदर्श शाळा' म्हणून विकसित केल्या जात असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी ५१ विद्यार्थ्यांचा इस्रो (ISRO) येथे अभ्यास दौरा आयोजित केला जाईल. असे त्यांनी सांगितले.
बोर व धाम सिंचन प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी ४२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच, 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेतून १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. गुंतवणूक परिषदेतून १,२७४ कोटींचे सामंजस्य करार झाले असून, यातून ३,३१४ तरुणांना रोजगार मिळणार आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून जिल्ह्यातील ३ लाखांहून अधिक महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. अशी माहिती पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानात राज्यामध्ये प्रथम आलेल्या वर्धा जिल्हा परिषदेचे आणि इतर पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाला स्मरून, वर्ध्याच्या ऐतिहासिक भूमीतून सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्यासह अनेक मान्यवर, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.