

वर्धा : जिल्ह्यातील पात्र आणि निकषात बसणाऱ्या सर्व अतिक्रमणधारक नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे तातडीने वाटप करण्याचे शासनाचे धोरण आहे. सन २०११ पूर्वीच्या सर्व अतिक्रमणधारकांना येत्या तीन महिन्यांत पट्टे वाटप पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पट्टे वाटप प्रक्रियेत काही अडचणी किंवा शासन निर्णयात दुरुस्ती आवश्यक असल्यास, ती तातडीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महसूलमंत्र्यांनी महसूल विषयक विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीस पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समिर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आणि सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत महसूलमंत्र्यांनी शर्तभंग, नझूल जमिनी फ्री होल्ड करण्याची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. संबंधित जमीनधारकांकडे महसूल कर्मचाऱ्यांना पाठवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पट्टे वाटप करा, असेही सांगितले. सिंधी समाजाच्या नागरिकांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून पट्टे वाटप करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यात जास्तीत जास्त लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत किमान एक लाख लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करा, असे निर्देश देण्यात आले. तसेच, नव्याने लागू झालेल्या वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, एमसॅंन्ड धोरणांतर्गत नवीन क्रशर परवाने गतीने द्यावेत, उत्खननाचे ड्रोन मॅपिंग करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करावा, असेही सांगितले. रेतीघाटांच्या साठ्याचे सर्वेक्षण चुकीचे असल्यास नव्याने ड्रोन सर्वेक्षण करूनच वाळूचा लिलाव करा, असेही निर्देश देण्यात आले.
महसूल अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांचा तातडीने निपटारा करा. भोगवटदार दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचे धोरण राबवा, गरज असल्यास विशेष शिबिरे घ्या. जिवंत सातबारा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे डीबीटी न झाल्यास त्यांच्या गावात यादी प्रसिद्ध करून तलाठ्यांमार्फत प्रक्रिया पूर्ण करा, असेही निर्देश देण्यात आले.
शासन लोकाभिमुख झाले आहे, याचा अनुभव नागरिकांना यावा, असे काम करा. उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी आठवड्यात दोन गावांना भेट द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यात एकदा जनसंवाद साधावा, असेही बावनकुळे यांनी सांगितले. घरकूल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती घरपोच देण्याचे धोरण आहे. त्यासाठी तलाठ्यांमार्फत वाहतूक पास देऊन सर्व रेती एकदाच उपलब्ध करून द्या, असेही आदेश देण्यात आले.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पट्टे वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश दिले. गजानन नगरातील पट्टे वाटप पूर्ण झाले असून, वर्धा शहरातील अन्य पात्र लाभार्थ्यांसह सावंगी (मेघे) येथीलही वाटप लवकरात लवकर करा, असे सांगितले. आमदारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले.
या बैठकीत जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या, योजनांची अंमलबजावणी आणि अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महसूल विभागाने नागरिकाभिमुख आणि गतिमान प्रशासन देण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले.