

Dadarav Keche
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात गुरुवारी रात्री एका हायव्होल्टेज ड्राम्याने खळबळ उडाली. भाजपचे विधानपरिषद आमदार दादाराव केचे यांना संतप्त महिलांनी भररस्त्यात घेरून जाब विचारल्याचा प्रकार घडला. नगरपरिषद निवडणुकीत केचे यांनी भाजपच्या उमेदवाराऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आमदार दादाराव केचे हे आर्वी येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या पुतण्याला भेटून परतत होते. तळेगाव रोडवर सारिका लोखंडे आणि शुभांगी भिवगडे यांच्यासह काही महिलांनी त्यांची दुचाकी अडवली.
यावेळी महिलांनी आरोप केला की, "केचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करून भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला. तसेच प्रचारादरम्यान महिलांबद्दल अपप्रचार करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली." या वादाचे रूपांतर मोठ्या गोंधळात झाले आणि बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि वाद मिटवला.
या घटनेनंतर आमदार दादाराव केचे यांनी आर्वी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, "गैरकायदेशीर जमाव जमवून मला रस्त्यात अडवण्यात आले. मला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या हेतूने कट रचून हल्ला करण्यात आला."
केचे यांनी सारिका लोखंडे, मनीषा बावने, शुभांगी भिवगडे, लक्ष्मी घाटनासे, धनंजय घाटनासे, पंकज लोखंडे, रवी गाडगे, प्रतीक बावणे आणि संजय घाटनासे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. "माझ्या जीवाला धोका असून मला संरक्षण मिळावे आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी," अशी मागणीही त्यांनी केली आहे.