वर्धा : धारदार शस्त्राने वार करत युवकाची हत्या करण्याची घटना त्रिमुर्तीनगर परिसरात रविवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. वर्ध्याच्या त्रिमुर्तीनगर परिसरातील नीलेश वांढरे (वय ३४) हा त्याच्या पत्नीसह जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण करुन परतल्यानंतर नीलेश वांढरे, पत्नी आणि मुलगा घरी बसून होते. काही वेळातच तोंडाला रुमाल बांधून संशयित आरोपी सचिन पाराशर (रा. हिंगणघाट) हा आला. सचिन पाराशरने घरात जावून नीलेश वांढरेच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्राने वार केले. त्यात नीलेश वांढरेचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर सचिन पाराशरने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, रामनगरचे ठाणेदार सार्थक नेहते वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेट दिली. याप्रकरणी तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. आरोपीने धारदार शस्त्राने नीलेश वांढरे याच्या छातीवर, पोटावर तब्बल आठ वार केले. त्यात नीलेशची आतडीच बाहेर निघाली. निर्घृणपणे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली.