भोकरदन : जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप शिवारात एका तृतीयपंथी व्यक्तीचा गळा चिरून खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याची खळबळजनक घटना घडली. तालुक्यातील सिरसगाव मंडप शिवारात सोमनाथ सहाने यांच्या शेतातील विहिरीत पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सायंकाळच्या सुमारास एक मृतदेह तरंगताना आढळून आला.
हा मृतदेह ३५ ते ४० वर्षीय महिलेचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. संबंधित शेतकऱ्याने तातडीने गावातील पोलिस पाटील आणि पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी विहिरीजवळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. भोकरदनचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी पाहणी केली.