

भंडारा, पुढारी वृत्तसेवा: भंडारा जिल्ह्यात आज (दि.१९) दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि गारांचा पाऊस पडल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. सुमारे दीड तास आलेल्या पावसाने दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने उन्हाळी पिकांसह भाजीपाला, टरबुजाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.
काढणीला आलेल्या टरबुजाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. वातावरणात गारवा तयार झाला असून धान पीक व इतर भाजीपाला पिकाला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही शेतात काढणीला आलेले पीक वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाले आहे. भंडारा तालुक्यातील खमारी बुटी येथील एका घरावर झाड कोसळून एक महिला जखमी झाली.
अवकाळीमुळे कृषी महोत्सवाचा बोजवारा
भंडारा शहरातील दसरा मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव सुरू आहे. जोरदार पावसामुळे कृषी महोत्सवाचा पुरता फज्जा उडाला. शेतकऱ्यांच्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले. कृषी प्रदर्शनात खाद्यपदार्थांचे स्टॉल, शेती यांत्रिकीकरणाशी संबंधित उपकरणे, शेतीतील विविध प्रयोगासह, यशोगाथा दालन आदींचा समावेश आहे. आज रविवार असल्याने नागरिक मोठ्या संख्येने कृषी प्रदर्शनाला भेट देतील, असा अंदाज होता. परंतु, पावसामुळे मैदानावर उभारण्यात आलेल्या शामियानाची नासधूस झाली. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते.
हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता. तरीसुद्धा कृषी विभागाने कृषी महोत्सवाचे आयोजन कोणत्या आधारावर केले. झालेले नुकसान कोण भरुन देणार ? असा संताप शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा