

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चिमूर तालुक्यातील गोसेखुर्द कालव्यावर सुरू असलेल्या पुल बांधकामाकरीता रेती घेऊन जाणारा हायवा ट्रक गोसेखूर्द कालव्यात पलटी झाला. यामध्ये चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (दि.२७) सकाळी ८ च्या सुमारास शंकरपूर ते भिसी मार्गावरील आसोला गावाजवळ घडली. चालक दीपक इंद्रदीप (वय २८ ) व वाहक प्रताप शिवकुमार राऊत (वय २६, रा. सुरगाव, ता. उमरेड) असे मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिमूर तालुक्यातील गोसेखुर्द कालव्यावर शंकरपूर पासून एक किलोमीटर अंतरावर गोसेखुर्द कालवा आहे. या कालव्यावर पूलाचे बांधकाम सुरू आहे. आज सकाळी पुलाच्या कामाकरीता रेती भरलेला ट्रक ब्रह्मपुरीवरून निघाला होता. पुलाजवळील वळणमार्गावर चालकाचे संतुलन बिघडल्याने पूल तोडून ट्रक कालव्यात कोसळला. यात चालक दीपक इंद्रदीप व वाहक प्रताप शिवकुमार राऊत दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही उमरेड तालुक्यातील सुरगाव येथील रहिवासी होते. कालव्यातील चिखलात दबला गेलेला ट्रक क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांचेही मृतेदह शवविच्छेदनाकरीता पाठविले.
हेही वाचा