चंद्रपूर जिल्ह्यातील ३० गावांमध्ये साजरी होणार आदर्श होळी

पर्यावरणपूरक होळी
पर्यावरणपूरक होळी
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी न चुकता येणारा होळी हा सर्वांचाच आवडता सण. रंग आणि पाण्याची मनसोक्त उधळण करत पारंपारिक पध्दतीने होळी साजरी करणे सर्वांनाच आवडते. काही सुजाण नागरिक यावेळी पाणी वाचवून पर्यावरण सांभाळण्याचा सल्ला देतात. मात्र होळी सणाच्या निमीत्ताने मागील काही वर्षांपासून ग्रामशुध्दी करत रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपुरक होळी साजरी करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित ग्रामनिर्मीती करण्याचा गुरूदेव भक्तांचा प्रयत्न सुरू आहे. यावर्षी आयोजनाचे ९ वे वर्ष असून जिल्ह्यातील ३० गावांमध्ये एकाचवेळी हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

गुरूदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून सुरू झालेल्या रंगमुक्त, पाणीमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपुरक होळी या उपक्रमाचे लोन बघता बघता भद्रावती, चंद्रपूर, वरोरा व कोरपना या तालुक्यांमध्ये पोहोचले असून यावर्षी सदर तालुक्यांतील ३० गावे उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामध्ये भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (रै.), घोडपेठ, लोणारा (पा.), चपराळा, हेटी, गोरजा, कुडरारा, कोची, घोनाड, सागरा, चरूर घारापुरे, धानोली, वरोरा तालुक्यातील बोर्डा, जामगाव (खु.), चंद्रपूर तालुक्यातील राऊत ले आऊट तुकूम, उर्जानगर, मोरवा, ताडाळी, येरूर, नागाळा, कोरपना तालुक्यातील कवठाळा, भारोसा, बाखर्डी, बिबी, वडगांव, खैरगाव, कन्हाळगाव, पिंपळगाव, अंतरगाव, निंबाळा या ३० गावांत एकाचवेळी गुरूदेव सेवा मंडळातर्फे हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आदर्श ठेवत व होळी करा व्यसनांची, उधळण करा प्रेमाची या ब्रिदवाक्याला आदर्श मानत या गावांतील गुरूदेव मंडळे एकत्र येवून आपापल्या गावात ग्रामगीता प्रणीत रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपुरक अशी होळी साजरी करणार आहेत.

ग्रामगीतेतील तत्वानुसार होळी म्हणजे ग्रामशुध्दिदिन व धुलिवंदन म्हणजे परस्परांतील मतभेद विसरून प्रेमभाव वाढीस लावणे. ग्रामगीतेमध्ये सांगितलेली ही मार्गदर्शक तत्वे लक्षात घेवून होळी व धुलिवंदन या दिवशी या ३० गावांमध्ये संबंधित गावांतील गुरूदेव सेवा मंडळांमार्फत एकाचवेळी लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यानुसार, होळीच्या दिवशी ग्रामसफाई करून दिवसभरात जमा झालेला कचरा होळीचे ठिकाणी होलीका दहन म्हणून जाळण्यात येणार आहे. व त्या अग्नीप्रकाशात गावातील नागरीक व्यसनमुक्तीचा संकल्प घेणार आहेत.

परंपरेनुसार होलीका दहन करण्यासाठी लाकडांचा भरपूर वापर करण्यात येतो. यासाठी लाखो वृक्षांची कत्तल करण्यात येते. साहजिकच यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मात्र, ग्रामसफाईच्या माध्यमातून जमा झालेल्या कचऱ्याची होळी केल्यास पर्यावरणाचे रक्षणही होईल शिवाय गाव स्वच्छ व सुंदर बनेल. परिणामी, नागरिकांना प्रदुषणमुक्त व चांगल्या आरोग्याचा लाभ घेता येईल. तसेच परंपरेनुसार सायंकाळी घरात बनविलेल्या गोड-धोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून हे अन्न होळीच्या अग्नीला समर्पीत करण्यात येते. मात्र, यावेळी हे अन्न वाया जावू न देता एका ठिकाणी जमा करून गरजूंना वाटप करण्याचा विचारही गुरूदेव सेवा मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून केला जाणार आहे. धुलिवंदनाच्या दिवशी पाण्याचा वापर न करता रंगमुक्त होळी साजरी करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्याचे कार्य या गावांमध्ये गुरूदेव भक्तांकडून केल्या जाणार आहे.

मा. सेवकराम मिलमिले तसेच जनार्दन देठे सर (बेलगाव देशपांडे) यांच्या प्रेरणेतून रंगमुक्त व पर्यावरणपुरक होळीच्या प्रेरणादायी उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. गुरूदेव भक्तांनी ग्रामनिर्मीतीच्या कार्याला प्रतिसाद दिल्यामुळे हे शक्य होत आहे. वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेल्या ग्रामगीतेतील तत्वज्ञानानुसार सर्वांनी आपले गाव आदर्श करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच सुदृढ समाजाची निर्मीती होईल.
:- नामदेव आस्वले

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news