

Swami Jitendranath Maharaj : शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांत शिक्षक आणि प्राध्यापकांना 'सर' न म्हणता 'आचार्य' असे संबोधण्याची परंपरा सुरू करावी, अशी मागणी श्रीनाथपीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केली आहे. अमरावतीमध्ये शिव परिवारकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वामी जितेंद्रनाथ महाराज म्हणाले की, 'सर' हा शब्द ब्रिटिशांनी सुरू केलेला आहे. सर म्हणजे मान्यवर तर शिक्षक म्हणजे माय, शिक्षक म्हणजे बाप आणि गुरु आहे. त्यामुळे 'सर' ऐवजी 'आचार्य' असे म्हणण्याची परंपरा सुरू केल्यास गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातील पवित्रता टिकून राहील आणि गुरु-शिष्य परंपरेला नवसंजीवनी मिळेल, असे स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी म्हटले आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे हा नसून, ज्ञानाने परिपूर्ण असा समाज निर्माण करणे हा आहे. त्यामुळे शिक्षकांना मान दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
शिक्षक म्हणजे आई, शिक्षक म्हणजे बाप, शिक्षक हा गुरु आहे. समर्थ शिक्षक म्हणजे भगवान गोपाल कृष्ण तर घडणारा, ऐकणारा अर्जुन आहे. असे नाते 'सर' हा शब्द वापरला तर कसे होईल, असा सवाल करत सर या शब्दापेक्षा 'आचार्य' हा शब्द श्रेष्ठ आहे, असेही स्वामी जितेंद्रनाथ महाराज म्हणाले.
'सर' हा शब्द ब्रिटिशांचे बिरुद आहे. मात्र आपल्या कडील शिक्षक जर हा बिरुद मिरवत असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, परंपरा यांचा अपमान आहे. किमान मराठी विद्यापीठामध्ये तरी प्राध्यापक किंवा प्रोफेसर यांना सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी, असा माझा आग्रह आहे, असेही जितेंद्रनाथ महाराज म्हणाले.