माणिक पवार
नसरापूर : भोर तालुक्यातील गुंजनमावळ भागातील 84 गावांचे श्रद्धास्थान आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेशी निगडीत मोहरी बुद्रुक येथील प्राचीन अमृतेश्वर शिवमंदिर आजही भाविकांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र आहे. हेमाडपंती शैलीत बांधलेले हे शिवकालीन मंदिर शतकानुशतकांचा इतिहास, अद्वितीय शिल्पकला आणि धार्मिक परंपरा जपत आहे. मंदिरातील प्रत्येक दगड, प्रत्येक शिल्प भक्तांना वेगळी कथा सांगत असल्याची अनुभूती देते. (Pune Latest News)
हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी हैबतराव शिळीमकर यांचे आराध्यदैवत मानले जाते. आजही त्यांचे वंशज व स्थानिक ग्रामस्थ याठिकाणी अखंड भक्तिभावाने पूजाअर्चा करतात. मंदिरातील पौरोहित्याची जबाबदारी कुलकर्णी-पाटील घराण्याकडे असून, गुरव कुटुंब परंपरेने त्रिकाळ पूजा करीत आहे. दरवर्षी होणार्या कावड यात्रेतून हे मंदिर शिखर शिंगणापूरशी जोडले गेले आहे.
ऐतिहासिक संदर्भानुसार, राजमाता जिजाऊ साहेबांनी हैबतरावांना शिवापूर येथे बोलावून बालशिवबांच्या रक्षणाची जबाबदारी दिली होती. ती स्वीकारून हैबतरावांनी शिवबांना घेऊन मोहरी येथील अमृतेश्वर मंदिरात अखेरच्या श्वासापर्यंत शिवबांचे रक्षण करण्याची शपथ घेतली, अशी आख्यायिका आजही जिवंत आहे. शिवराय अनेकदा येथे येऊन पादुका काढून अनवाणी पायाने मंदिरात दर्शन घेत असत. न्यायदानाच्या घटना या मंदिराशी निगडीत असल्याचेही इतिहासात उल्लेख आहे.
मंदिर चोहोबाजूंनी दगडी तटबंदीने वेढलेले असून प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. कलात्मक शिखर, कीर्तीमुखाने सजलेला मंडप, विशाल नंदी व नक्षीदार दगडी स्तंभ मंदिराचे वैभव अधोरेखित करतात. गंडभेरुंड, हत्ती, वाघ, बैल, कमळ यांसारखी प्रतीकात्मक शिल्पे शक्ती व भक्तीचे दर्शन घडवतात. गर्भगृहात पूर्वाभिमुख प्राचीन शिवलिंग असून, त्याखालून वाहणारा पाण्याचा प्रवाह उत्तरेस दगडी कुंडात येतो. या कुंडात वर्षभर पाणी साठलेले असते.
रामनवमीला कुंडातून पाणी भरून कावड शिखर शिंगणापूरला जाते. तेथे पूजा करून हनुमान जयंतीच्या दुसर्या दिवशी परत गावात येते. सोमवारी गावच्या सीमेवर कावडीसह जाऊन ग्रामस्थांचे वनभोजन होते. नवरात्र उत्सवात येथील दानवले कुटुंबीय मानकरी असतात. दसर्याला देवांसह पालखी सीमोल्लंघनाला जाते व तेथून अपट्याचे सोने लुटून देव गावात येतात. त्रिपुरारी पौर्णिमला रात्री बारा वाजता पालखीचा मंदिराला वेढा घालून दीपमाळ पेटवली जाते. उत्सवात शिळीमकर घराण्याला पालखीचा मान आहे. तांबाड येथील शिक्केकरी शिळीमकर घराण्यांना मान असून तांभाडचे सरपंच अमोल शिळीमकर हे सागंतात की, या शिवकालीन अमृतेश्वराचा महिमा खूप मोठा आहे. मोहरी खुर्द व बुद्रुक ग्रामस्थ सर्व भाविक परंपरेचे मानकरी एकत्र येऊन देवाचे सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात.