

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर जे काय सुरू आहे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे कालपर्यंत विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे करत होते. मात्र त्यांनी आज (दि. ४) शरद पवार यांची राष्ट्रीय राजकारणाला गरज असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात आज शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यानंतर या संदर्भात विचारले असता पटोले यांनी शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांची राष्ट्रीय राजकारणात गरज आहे असे स्पष्ट केले. मात्र पुढील अध्यक्ष कोण व्हावा हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे याविषयी पुनरुच्चार केला. कर्नाटकमध्ये भाजप पराभूत होत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज वेगवेगळी विधाने करीत आहेत. संजय राऊत हे बेळगाव न्यायालयात हजर राहण्यासाठी गेले होते या निमित्ताने फडणवीस असे का बोलले हे कळायला मार्ग नाही. खरेतर फडणवीस चाणक्य आहेत त्यांच्या मनात नेमकं काय हे कळत नाही, असेही पटोले म्हणाले.
दरम्यान, राज्यातील वज्रमूठ सभा नियोजित कार्यक्रमानुसारच होतील. मात्र सध्या रोज अवकाळी पाऊस, गारपीट उन्हाळ्यात पूर अशी नैसर्गिक आपत्ती असल्याने तूर्तास या सभा पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व संमतीने मुंबईतील बैठकीत घेण्यात आला. यामुळे वज्रमठ सभा पुढे होणार असल्याचे पटोले यांनी एका प्रश्नाचे उत्तरात स्पष्ट केले.
हेही वाचा