Barsu Refinery : बारसूतील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ निलेश राणे काढणार मोर्चा

Barsu Refinery : बारसूतील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ निलेश राणे काढणार मोर्चा
Published on
Updated on

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : रिफायनरी प्रकल्पाला दाखवला जाणारा विरोध हा किरकोळ आहे, मात्र समर्थन खूप आहे आणि हेच समर्थन दाखवायला आम्ही सहा मे रोजी समर्थन जवाहर चौकातून मोर्चा काढणार आहोत. आम्हाला कुणाला विरोध करण्यासाठी मोर्चा काढत नाही तर इथल्या कोकणी तरुणांना रोजगार मिळायला हवा त्यामुळे रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे अशी भुमिका माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली आहे.

गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ४ वाजता राजापूर विश्रामगृहामध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भुमिका मांडली. यावेळी कॉंग्रेससह शिवसेनेचे (शिंदे गट) सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या ५१ संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. सध्याची बारसुची जागा ही उध्दव ठाकरे यांनीच सुचवली होती. मात्र सत्तेतुन पायउतार होताच त्यानी विरोधाला सुरुवात केली आहे. त्यांची ही दुटप्पी भुमिका ही कोकणी तरुणांचे भविष्य उध्वस्त करणारे आहे. आज रिफायनरी प्रकल्पाला प्रत्यक्षात विरोध नाही मात्र बाहेरची लोकं आणून खासदार विनायक राउत व शिवसेना ठाकरे गट हे विरोधाचे चित्र निर्माण करत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांचे या प्रकल्पाला समर्थन आहे. हेच समर्थन सर्वांसमोर आणण्यासाठी सहा मे चा मोर्चा आयोजित केला असल्याचे त्यानी स्पष्ट केले.

हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही मात्र काही दिवसांपासून जे विरोधाचे चित्र महाराष्ट्रात उभे केले जात आहे. ते सगळेच खरं नाही किंवा मोठयाप्रमाणात खरे नाही. समर्थनाची बाजू फार मोठी आहे हे दाखवण्याची आता वेळ आली आहे असेही यावेळी ते म्हणाले. आज संपूर्ण देशात कोकण म्हणजे प्रकल्पाना विरोध करणारा प्रदेश अशी ओळख काही मंडळीनी तयार केली आहे. ती पुसायला हवी म्हणून प्रकल्प समर्थनाचा हा भव्य मोर्चा आयोजित केला असल्याचे निलेश राणे म्हणाले.

जर कोणी वातावरण बिघडवण्यासाठी येणार असेल तर त्याला आम्ही उत्तर समर्थनाच्या मोर्च्याने देऊ. त्यासाठी सहा मे रोजी सकाळी ११ वाजता जवाहर चौकातून या मोर्च्याची सुरुवात होईल. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढला जाईल. त्या दिवशी अन्य कोण येतयं हे आमच्यासाठी महत्वाचे नाही मात्र बारसु रिफायनरीचा विषय सातत्याने बदनाम होतोय ते थांबवण्यासाठी आम्हाला हा मोर्चा काढावा लागतोय. प्रकल्प समर्थनाची ताकद दाखवावी लागत असल्याचे माजी खासदार निलेश राणे यानी पत्रकार परिषदे दरम्यान स्पष्ट केले.

यावेळी त्यानी खासदार विनायक राउत यांच्यावर सडकून टिका केली. खासदार विनायक राउत याना रिफायनरी म्हणजे काय हेच समजेलेले नाही त्याना रिफायनरी म्हणजे एक छोटेसे दुकान वाटत असेल अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी मारली. तर शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या वेळोवेळी बदलणाऱ्या भुमीकेचाही चांगलाच परामर्श घेतला.

सहा मे रोजी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे रिफायनरी विरोधकांना भेटण्यासाठी बारसु येथे येत आहेत. त्याचवेळी भाजपासह बाळासाहेबांची शिवसेना व महाविकास आघाडीतला घटक पक्ष कॉंग्रेस यानी हा समर्थन मोर्चा आयोजित केल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडली आहे. आता हे दोन्ही मोर्चे प्रशासन कसे हाताळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news