

नागपूर - मुंबईत झालेल्या युवक काँग्रेसच्या मोर्चाच्या निमित्ताने अनेक व्हेंडरचे लाखो रुपयांचे पेमेंट थकविल्या प्रकरणी युवक काँग्रेसचा वाद आता पोलिस दरबारी गेला आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याकडे पैसे मागण्यास गेलो असता त्यांच्या समर्थक सहकाऱ्यांनी शिवीगाळ केली. पैसे मिळणार नाहीत, निघून जा अशी रिव्हॉल्वर दाखवित धमकी दिली अशी तक्रार करण्यात आली आहे.
मध्यंतरी अनेक नेतापुत्रासह युवक काँग्रेसच्या 70 पदाधिकाऱ्यांना एकाचवेळी निलंबित करण्यात आल्याचे प्रकरण त्यानंतर दिल्लीमधून या कारवाईला स्थगितीची नामुष्की नंतर आता हे प्रकरण चर्चेत आहे. रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रशांत गायकवाड यांनी ही तक्रार केली असून पोलिस आयुक्तांना निवेदनही दिले आहे. आपल्यावर मोर्चासाठी ही जबाबदारी होती. काही पैसे मिळाले मात्र मोठी रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ते मागण्यासाठी नागपुरात आलो तेव्हा माजी मंत्री नितीन राऊत यांनी कुणाल राऊत यांच्याशीच बोला असे सांगितले.
कुणाल राऊत यांच्याकडे गेलो तेव्हा अभिषेक वर्धन सिंग आणि त्यांच्या तीन चार कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकावले असा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला.दुसरीकडे यासंदर्भात रायगड जिल्ह्यातील मोहपाडा पोलिस ठाण्यात अभिषेक सिंग व त्याच्या साथीदाराविरोधात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली. कुणाल राऊत यांच्याच इशाऱ्यावर ही धमकी दिल्याचा त्यांचा आरोप असल्याने काँग्रेस हायकमांड या तक्रारीची कशी दखल घेणार, पोलिस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.