

Maharashtra Cyber Crime
नागपूर : पश्चिम नागपूरचे आमदार व नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारला कठोर प्रश्न विचारत, सायबर गुन्हे रोखण्यासाठी खर्च झालेल्या सुमारे २,००० कोटी रुपयांचा नेमका उपयोग कुठे झाला, असा थेट सवाल केला आहे. सायबर गुन्ह्यांमधून फसवलेल्या पैशांची रिकव्हरी केवळ २% इतकीच असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे म्हणाले की, राज्यात दररोज हजारो नागरिक सायबर फसवणुकीचे बळी ठरत आहेत. परंतु फसवलेल्या पैशांची परतफेड अत्यंत नगण्य प्रमाणात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या मुद्द्यावर सरकारला जाब विचारत ठाकरे यांनी विचारले की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जर २,००० कोटी रुपये खर्च झाले असतील, तर त्याचे ठोस परिणाम नागरिकांना का दिसत नाहीत?
ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रीमहोदयांनी राज्यातील नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी दर महिन्याला राज्यातील सर्व नागरिकांना २१ कोटी संदेश पाठविण्याचे तसेच सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ३४ कोटी रुपये खर्च करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ठाकरे यांनी स्पष्ट केले की, केवळ ‘गोल्डन अवर’च्या घोषणा करून समस्या सुटणार नाही. नागरिकांची फसवणूक होण्यापूर्वीच रियल-टाइम अलर्ट प्रणाली विकसित करणे, जलद तपास यंत्रणा उभारणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हेगारांपर्यंत त्वरीत पोहोचण्याची प्रभावी व्यवस्था निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला पाहिजे, ही सरकारची मूलभूत जबाबदारी असल्याने सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी तातडीने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची मागणी केली.