

Mumbai vs Gujarat controversy
नागपूर : महाराष्ट्रावर, मुंबईवर सतत अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली. मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे, मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे. त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी लढावे लागणार आहे मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल, तर आनंदच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती, मनसे बाबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती असे वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी होती, विधान सभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली नाही, आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात यातून इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला धक्का लागला, असे मानण्याचे कारण नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. काँग्रेस हा पक्ष जातीयवाद, धर्मवाद करत नाही. काँग्रेस हा संविधान मानणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.