

Moneylenders racket Vidarbha Marathwada
नागपूर : चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराकडून फक्त एक लाख रुपये घेतले पण त्यावरील व्याज वाढून ते ७४ लाख झाले. अखेर त्याची किडनी विकण्यात आली. असे शेतकऱ्यांना धमकावून किडनी विकणारे मोठे रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे याची कंबोडियामध्ये किडनी विकल्यावर तो व्हिएनतियान इथल्या कॉल सेंटरमध्ये काम करत होता.तिथे त्याला मारहाण झाली. पासपोर्ट काढून घेतला. याबाबत माहिती मिळाली. तेव्हा त्याला सुरक्षित भारतात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आणले. या प्रकरणात पाच वेळा चंद्रपूर पोलिस अधीक्षक यांना फोन करून कारवाईची मागणी केल्याचे वडेट्टीवार यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
सरकारने आज SIT नेमली तरी ते पुरेस नाही. शेतकऱ्यांना त्रास देऊन पैसे लुबाडणारे सावकारांचे मोठे रॅकेट आहे. विदर्भ आणि मरावाड्यात जिल्हा जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली टीम करून हे रॅकेट पकडले पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ महायुती सरकारने आणली हे सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
किडनी विकणारे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून किडनी विकणारे रॅकेट सक्रिय असू शकते. यात डॉक्टर, एजंट असू शकतात याची चौकशी झाली पाहिजे,जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.