विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या मतदारसंघातील काँग्रेसच्या विजयाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे पक्षातील वजन वाढले आहे. गडचिरोली न जिंकल्यास राजकीय संन्यास घेण्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली होती. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाजपचे अशोक नेते यांचा काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांनी १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी पराभव केला. नामदेव किरसान यांना ६ लाख १७ हजार ७९२, तर निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे अशोक नेते यांना ४ लाख ७६ हजार ६९६ मते मिळाली. बसपाचे प्रा.योगेश गोन्नाडे हे १९ हजार ५५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 'नोटा' ला १६ हजार ७१४ मते मिळाली, वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी हे १५ हजार ९२२ मते घेऊन पाचव्या क्रमांकावर राहिले.