Vidharbha Heavy Rainfall : संततधार पावसाने विदर्भात हाहाकार; अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट, जनजीवन विस्कळीत

नागपूर, चंद्रपूरात अनेक मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद : वाहतूकही मंदावली
Vidharbha Heavy Rainfall
नद्यांना आलेल्‍या पुरामूळे चंद्रपूरात अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर/ चंद्रपूर/ वर्धा : विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, अनेक रस्ते बंद झाले आहेत. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर शेतकऱ्यांना मात्र या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी पाऊस, जनजीवन विस्कळीत

चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सावली आणि नागभीड तालुक्यात अनुक्रमे ६९.३ आणि ६९.९ मिमी इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण पावसाची नोंद ५६५.८ मिमीवर पोहोचली आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या १३८ टक्के, तर संपूर्ण हंगामात ११७ टक्के पाऊस पडला आहे. जिवती तालुक्यात सर्वाधिक १७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर गोंडपिपरी, वरोरा आणि राजूरा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. चिमूर तालुक्यातील काही मार्ग पुरामुळे बंद झाले आहेत. हवामान विभागाने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला असून, प्रशासन सतर्क आहे.Vidarbha rain red alert

Vidharbha Heavy Rainfall
विदर्भात पावसाचे थैमान; नागपूरला ऑरेंज अलर्ट, पुढील 24 तासात मुसळधार

नागपूर व पूर्व विदर्भात पावसाचा जोर

नागपूर जिल्ह्यातही सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. वर्धा रोडवर झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ४१८.४ मिमी, म्हणजेच १६३.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असून, अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस झाला आहे. भंडाऱ्यात गोसीखुर्द धरणाचे २३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

नागपूरः वर्धा रोडवर झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली हाेती.
नागपूरः वर्धा रोडवर झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली हाेती.

वर्धा जिल्ह्यात पावसाने दिलासा, प्रकल्प ओसंडून वाहू लागले

वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, प्रकल्पांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार, तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मागील दहा-बारा दिवस पावसाने उघडीप दिल्याने पिके करपण्याची स्थिती निर्माण झाली होती, मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उमरी आणि दहेगाव (गोंडी) लघु प्रकल्प १०० टक्के भरले असून, सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बोर, निम्न वर्धा, धाम, पंचधारा, पोथरा, लाल नाला, वर्धा कार नदी आदी प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यात मागील २४ तासांत ३१.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

प्रशासन सतर्क, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले, धरणे भरू लागली असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य सुरू असून, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा, पण काही भागांत नुकसान

या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. मात्र, काही भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसानही झाले आहे. तसेच, रस्ते बंद, वाहतूक विस्कळीत, वीजपुरवठा खंडित अशा समस्या निर्माण झाल्या आहेत.

संततधार पावसामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले असले तरी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news