

नागपूर - बहूप्रतिक्षित अजनी पुणे वंदे भारत रेल्वे येत्या 10 ऑगस्ट रोजी ट्रायल रनसह सुरू होत आहे. मात्र ही गाडी सुरू होण्यापूर्वीच या गाडीचे प्रवासी शुल्क आणि दिवसभराचा बारा तासांचा स्लीपरविना प्रवास यावरून विरोध सुरू झाला आहे. अनेक प्रवासी तसेच प्रवासी संघटनांनी या संदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. खाजगी बसेसचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठीच या वंदे भारत एक्सप्रेसची वेळ अशी अवेळी ठेवण्यात आल्याची टीका सुरू झाली आहे.
विशेषता सणासुदीच्या काळात पुण्याकडे जाणाऱ्या येणाऱ्यांची मोठी गर्दी होते. खाजगी बसेसकडून वाढीव शुल्क आकारले जाते या स्थितीत ही वंदे भारत एक्सप्रेस उपयुक्त ठरेल असा रेल्वे प्रशासनाला विश्वास आहे. मात्र प्रवासी संघटनांनी मात्र या वंदे भारत एक्सप्रेसची देखील नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सारखी अवघड परिस्थिती होणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे काही दिवसानंतर प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे कोचेस कमी करावे लागले. नागपुरातून सकाळी 9.50 ला निघून रात्री 9.50 वाजता पुण्यात ही वंदेभारत पोहचणार आहे.
मात्र, स्लीपर कोच शिवाय 850 किलोमीटरचा प्रवास दिवसभरात 12 तासात केवळ बसून करणे अतिशय अडचणीचे असल्याची तक्रार सुरू आहे. यासोबतच सध्या उपलब्ध असलेल्या गाड्या विशेषत हावडा पुणे दुरंतो एक्सप्रेसच्या तुलनेत या वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे बरेच अधिक आहे. यामुळे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत असल्याचा एकीकडे पुण्यात शिक्षण,नोकरीस असलेले विद्यार्थी त्यांचे कुटुंबीय यांना आनंद असताना दुसरीकडे दिवसभराचा हा प्रवास त्रासदायक असल्याचे बोलले जात आहे. पुण्यातून देखील नागपूरकडे निघताना वेळ अडचणीची आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसात या अजनी पुणे वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळाला तरी मात्र नंतरच्या काळात या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील सिकंदराबाद प्रमाणेच पुनर्विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता रेल यात्री संघ सचिव ब्रिजभूषन शुक्ला , भारतीय यात्री केंद्र सचिव वसंतकुमार शुक्ला यांनी व्यक्त केली आहे.