

File Signed Under Influence
नागपूर : नागपूर येथील एका बिअर बारमध्ये शासकीय फाईल नेऊन पडताळणी करणे आणि त्यावर सह्या करणे या प्रकरणी चामोर्शी येथील उप अभियंता देवानंद सोनटक्के यांच्यावर अखेर सरकारने निलंबन कारवाई केली आहे. मात्र यामुळे सरकारचा कारभार बदलणार आहे का, नशेत कोणत्या फाईलवर सह्या केल्या ? असा सवाल काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
याविषयीचा सीसीटीव्ही समोर आला म्हणून ही अधिकाऱ्यावर तडकाफडकी कारवाई झाली पण अशा किती घटना घडत असतील? एका अधिकाऱ्याची फाईली कार्यालयाबाहेर घेऊन जाण्याची हिंमत झाली कशी? आणि त्यावर त्याने सह्या का केल्या? याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी करीत वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे.
नागपूरमध्ये एका बारमध्ये दारू पित असताना शासकीय फाईलींवर सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडता कामा नये असा इशारा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
दारू पित फाईली तपासणे हा मस्तवालपण त्या जिल्ह्यात सुरू आहे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत. या अधिकाऱ्याला सेवेतून काढून टाका, म्हणजे कोणी अधिकारी असे वागणार नाही.
यात कोण आहेत, त्यांनी कोणते काम केले आहे? काय व्यवहार झाला.या फाईलची चौकशी झाली पाहिजे असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.