

नागपूर : राज्यातील अतिवृष्टीग्रस्ताना मदतीच्या दृष्टीने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव विधिमंडळाच्या पटलावर ठेवावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आज चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले रात्री ते आपल्या आमदारांची बैठक घेणार आहेत. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ठाकरे म्हणाले, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी आपल्याकडे अद्याप असा प्रस्तावच आलेला नाही, असे सांगत राज्य सरकारचे बिंग फोडले. डबल इंजिन सरकार प्रत्यक्ष मदतीच्या दृष्टीने ठोस कार्यवाही करणार की, ढकलपंची करणार असा प्रश्न उपस्थित केला. पिक विमाच्या बाबतीत मदतीची थट्टा करण्यात आली याबाबतीत कारवाई करणार का, याविषयीचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे.
विरोधकांचा संवैधानिक अधिकार असताना विरोधी पक्ष नेतेपद न देता दोन, दोन उपमुख्यमंत्री पद दिले जाते ते रद्द करा. संबंधितांना केवळ त्यांच्या खात्याचे मंत्री ठेवा. तसेही सरकारमध्ये एक नंबर लाच महत्त्व आहे बाकी बिना नंबरचे मंत्री असल्याचे भाजपनेच सांगितले आहे असा टोला लगावला. हिवाळी अधिवेशन अर्ध्यावर आलेले असताना विदर्भ, मराठवाड्याला नेमके काय मिळाले हे कळलेले नाही. अधिवेशन संपताच राज्यात निवडणुका जाहीर होणार आहेत अशा पद्धतीने निवडणुका कधी बघितल्या नाही. महाराष्ट्राची बेबंदशाही आता इतर राज्यात सांगितली जाते असा आरोप केला. यावेळी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अनिल परब उपस्थित होते.
दरम्यान, एकमेकांना बदनाम करण्याचे काम महायुती सरकारमध्ये सुरू आहे. रोज धाडी घातल्या जात आहेत.दुसरीकडे भ्रष्ट मंत्र्यांना क्लीन चीट दिली जात आहे. खरे तर मला दया येते. कोण होतास तू काय झालास तू भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलेस तू... ! असा काव्यमय आरोप करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नव्याने पांघरून खाते खाते सुरू करावे, स्वतःकडे ती जबाबदारी घ्यावी अशी सूचनाही उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केली.