

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपुरातील एका तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे. याचवेळी वर्धा रोडवरील निवासस्थानी प्रतापनगर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला.
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात यापूर्वी अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल आले होते. त्यानंतर कर्नाटकमधून एका उमेश काथा नामक कुख्यात आरोपीला अटक करण्यात आली होती.
आता त्यांच्या महालातील निवासस्थानी बॉम्ब असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. कंट्रोल रुमला नितीन गडकरी यांचे महाल येथील निवासस्थान बॉम्बने 10 मिनिटात उडविणार असल्याचा 112 वर फोन आला. मोबाईलधारक तरुणाचे नाव उमेश विष्णू राऊत, रा. तुलसीबाग रोड, महाल, हल्ली राहणार विमा दवाखाना, सक्करदरा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. उमेश विष्णू राऊत मेडिकल चौकातील दारू दुकानात काम करतो. त्यास विमा दवाखाना येथून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.