

चंद्रपूर : बुद्ध पौर्णिमेच्या रात्री ब्रम्हा (T-158) वाघाचा खात्मा करून स्वतः गंभीर जखमी झालेला ताडोबाचा किंग छोटा मटका (T-126) याला चंद्रपूर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधून नागपूरच्या गोरेवाडा बचाव व पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले आहे. गोरेवाडा येथे त्याच्यावर दीर्घकालीन उपचार केले जाणार आहेत.
छोटा मटकाचे वय दहा वर्षे असून त्याचे व्यक्तिमत्त्व देखणे व भव्य आहे. मात्र अलीकडील लढाईत तो गंभीर जखमी झाला. त्याच्या तोंडाला आणि पुढच्या डाव्या पायाला झालेल्या जखमांमुळे तो नीट चालू शकत नव्हता. सुरुवातीला नैसर्गिक उपचार करूनही त्याची प्रकृती सुधारली नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्यावरणप्रेमी व वन्यजीवप्रेमींनी गंभीर चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाने स्वतःहून दखल घेतली व जनहित याचिका दाखल करण्यात आली.
त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी छोटा मटका याला ताडोबाच्या खडसंगी परिक्षेत्रातून रेस्क्यू करण्यात आले. चंद्रपूर टीटीसी येथे तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्याच्या पायाचे ‘अल्ना’ हाड मोडलेले असून तीन दात जखमी असल्याचे आढळले. त्यामुळे त्याला जंगलात परत सोडणे शक्य नसल्याचे निष्पन्न झाले. दीर्घकालीन वैद्यकीय देखभाल आवश्यक असल्याने अखेर त्याला गोरेवाडा येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
छोटा मटका याने आपल्या कार्यक्षेत्रासाठी व नयनतारावरील प्रेमासाठी आतापर्यंत तीन वाघांचा खात्मा केला आहे. त्याच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे देश-विदेशातील पर्यटक त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येत असत. मात्र आता त्याचे आयुष्य प्रामुख्याने गोरेवाडाच्या बंदिवासात जाईल, अशी शक्यता आहे.