

चंद्रपूर : ताडोबातील अधिवास आणि नयनतारा वाघिणीवरील हक्कावरून सोमवारी (12 मे) बुध्द पौर्णिमेच्या रात्री घुसखोरी केलेल्या ब्रम्हा वाघासोबत झालेल्या लढाईत ताडोबाचा राजा छोटा मटका सध्या जखमी आहे. त्याचेवर घटनेच्या दुसऱ्या दिवसीपासून वैद्यकिय अधिकारी, वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निगरातील 27 जणांची टिम तैनात करण्यात आली आहे. जंगलातच त्याचेवर नैसर्गीक उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती ताडोबातील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. या लढाईत ब्रम्हा वाघ ठार झाला आहे.
ताडोबातील "छोटा मटका" वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध वाघ आहे. त्याचे नाव आणि प्रसिद्धी प्रामुख्याने त्याच्या वडिलांमुळे व स्वतःच्या वर्चस्ववादी स्वभावामुळे त्याला मिळाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रामदेगी क्षेत्रात छोटा मटकाचे प्रस्थ आहे. "छोटा मटका" म्हणजेच प्रसिद्ध वाघ "मटका" चा मुलगा आहे, ज्यामुळे त्याला "छोटा मटका" असे टोपण नाव देण्यात आले. ताडोबातील एक प्रभावशाली नर वाघ म्हणून त्यांची ओळख आहे. तो एक सामर्थ्यवान, उत्साही आणि आक्रमक स्वभावाचा वाघ आहे, तसेच त्याला ‘ताडोबाचा राजा’ म्हणून ओळखले जाते.
छोटा मटका हा ताडोबामधील सफारी पर्यटनाचे एक विशेष आकर्षण आहे. त्याचे दर्शन अनेक वेळा पर्यटकांना झाले आहे. त्याची शौर्यपूर्ण भटकंती, पट्ट्यांचे विशिष्ट नमुने, रुंद कपाळ, आणि सशक्त शरीरयष्टीमुळे तो सहज ओळखला जातो. नयनतारा वाघीणीचे त्याला आर्कषण आहे. नयनतारा ही वाघीण तिच्या तिच्या निळ्या डोळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिला बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. काही वर्षांपासून रामदेगी क्षेत्रात छोटा मटकाचे वर्चस्व आहे. त्याने या क्षेत्रात प्रवेश केल्यापासून त्याने दबदबा तयार केला आहे. इतर वाघांनी त्यांच्या इलाख्यात प्रवेश केलाच तर त्यांचेशी छोटा मटकाची लढाई ठरलेली आहे. यापूर्वी त्याने ताला, रूद्रा, बली, मोगली, बजरंग या वाघांशी लढाई करून त्यांना पिटाळून लावले आहे. 2023 मध्ये बजरंग, मोगली व आता घुसखोरी करणारा ब्रम्हा वाघाला त्याने ठार केले आहे.
बुध्द पौर्णिमेच्या रात्री ताडोबाच्या रामदेगी क्षेत्रात घुसखोरी केलेल्या ब्रम्हा वाघासोबत छोटा मटकाची जोरदार लढाई झाली. दोन्ही वाघ एकमेकांविरोधात भिडले. या भीषण लढाईत काही पर्यटकांना अनुभवता आली. झुंजीचा आवाजाने या परिसरात प्रचंड दशहत निर्माण झाली होती. या लढाईत छोटा मटकाने ब्रम्हा वाघाला ठार करून दम घेतला. पण तोही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडत होते. पायाला गंभीर दुखापत असल्याने त्याला चालता येत नव्हते. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेत. त्याच्या उपचारासाठी 27 वनाधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज तैनात केली आहे.
सध्या छोटा मटकाबाबत वेगवेगळ्या अफवा समोर येत आहेत. परंतु ‘पुढारी’ने ताडोबाच्या अधिऱ्यांकडून घेतलेल्या माहितीनुसार छोटा मटकावर नैसर्गिक उपचार सुरू केले आहे. म्हणजे वन्यजीव अधिकाऱ्यांनी छोटा मटका याच्या जखमांवर थेट हस्तक्षेप न करता त्याला नैसर्गिकरित्या बरे होऊ दिले आहे. अशा प्रकारे, वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणातच पुनर्प्राप्तीची संधी दिली जाते, जेणेकरून त्यांचे नैसर्गिक वर्तन आणि सामाजिक संरचना अबाधित राहण्यास मदत होते. मात्र या सर्व नैसर्गीक उपचार पध्दतीमध्ये पाच ट्रॅप कॅमेऱ्यांसह 27 वनाधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय अधिकारी निगराणी ठेवून आहेत. त्याच्या आरोग्याबाबत कोणतीही गंभीर चिंता नाही. वन विभाग त्याच्या हालचालींवर आणि आरोग्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती ताडोबाच्या सुत्रांनी दिली आहे.