

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : 'बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिए'.. या दिवंगत अभिनेते राजेश खन्नाच्या संवादाची आठवण करून देत आपण कुठेही नाराज नाही. मला डावलण्यात आले, असे काहीही नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, यापेक्षा मला मोठी जबाबदारी देणार आहेत, असे मी सुद्धा ऐकले आहे. मुळात मी ज्या पक्षातून येतो, तिथे राष्ट्र प्रथम हे आम्हाला शिकवले जाते. पद हे दुय्यम असते. त्यामुळे कार्यकर्त्याची नाराजी दूर करणार आहे. 1935 पासून अनेक मंत्री झालेत किती मंत्र्यांची नावे लक्षात राहतात, असा सवाल त्यांनी केला.
मंत्री म्हणून अनेक चांगली कामे करण्याची संधी मला मिळाली. अयोध्येतील राम मंदिरातील दरवाजासाठी, संसद भवनातील दरवाजासाठी लाकूड चंद्रपूरमधून गेलेले आहे, याचाही मला विशेष आनंद आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात येईल. संवादातून नक्कीच मार्ग निघेल, यावर त्यांनी भर दिला. दरम्यान, लवकरच ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.