

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे हेविवेट नेते आणि भाजपाची मुलुख मैदानी तोफ सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यावेळी मंत्रिमंडळात नाहीत. भाजपची सत्ता आली आणि मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाहीत, असे आजवर कधी घडलेच नव्हते. पण यावेळी हे विपरीत घडले. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मुनगंटीवार स्वतः नाराज नाहीत. पण त्यांच्या समर्थकांनी नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे. अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आहेत. चंद्रपुरातील अनेक लाडक्या बहिणींचे ऊर आपल्या भावाचं नाव नसल्यानं भरून आलं आहे. मुनगंटीवार यांनी ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ अशी भूमिका घेतली असली तर आम्ही गप्प राहणार नाही, असे या सगळ्यांनी ठरवलं आहे. त्यातूनच मुनगंटीवार यांचे चाहते चंद्रपुरातून पायीच निघाले असून ते नागपूरनंतर दिल्लीकडे कूच करणार आहे.
चंद्रपूरपासून दिल्ली गाठेपर्यंत आमचे पाय रक्तबंबाळ झाले, तरी चालेल पण सुधीरभाऊंना मंत्रिपद मिळायलाच हवं, अशी भूमिका या सगळ्यांनी घेतली आहे. मुनगंटीवार यांचे चाहते एक एक करीत या अनोख्या पदयात्रेत सहभागी होत आहेत. त्यांना एकच उत्तर हवं आहे. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून ऐनवेळी का वगळण्यात आले. सुरुवातीला हे सगळे कार्यकर्ते नागपूर येथे पायी पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीकडे कूच करणार आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांनाच दिल्ली मंत्रिपदापासून कशी काय वंचित ठेऊ शकते, असा प्रश्न या सगळ्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. कार्यकर्त्यांची चंद्रपूर ते नागपूर अशी पदयात्रा आज मंगळवारी दुपारी (दि. 17) सुरू झाली आहे. नागपूरमध्ये या कार्यकर्त्यांचे समाधान झाले, तर ठिक अन्यथा त्यांनी पुढचा प्रवास दिल्लीच्या दिशेने करण्याचा पक्का निर्धार केला आहे.
चंद्रपूरमधून सद्य:स्थितीत फारुख शेख, हरीश व्यवहारे, सुरज पारखी, अमित तामटकर, अरविंद बोरकर, देवानंद थोरात, भोजराज शिंदे, मनोज ठेंगणे, दीपक सिंग आदी कार्यकर्ते चंद्रपुरातून निघाले आहेत. पडोली, भद्रावती, वरोरा, खांबाळा या भागातून कार्यकर्ते या पदयात्रेत जुळले जाणार आहेत. नागपुरात पोहोचेपर्यंत या पदयात्रेतील कार्यकर्त्यांची संख्या मोठी होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांच्या समर्थकांचा आहे.