

Nagdwar Pilgrimage ST Bus Transport
नागपूर : नागद्वार यात्रा आजपासून सुरू झाली. मध्यप्रदेश प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष एसटी बसेसची चाके खोळंबली होती. आता यात आज (दि.१९) अखेर मार्ग निघाला असून २० ते ३० जुलै दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या बसेस भाविकांसाठी उपलब्ध असणार आहेत. गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक येथून दुपारी ४ ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत येताना आणि जाताना एसटी सेवा उपलब्ध असणार आहे.
मध्य प्रदेशमधील नागद्वार यात्रेकरिता भाविकांना डोंगरदऱ्यामधून जावे लागते. यंदा मध्यप्रदेश प्रशासनाने एसटीला परवानगी नाकारली. त्यामुळे विदर्भातील भाविकांना पंचमढीतील यात्रेला जाण्याकरिता पहिल्या टप्प्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागले. दरवर्षी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या नागपूर आगारातून शेकडो बसेस नागद्वार यात्रेसाठी सोडल्या जातात. यंदा यात्रेसाठी दररोज ४४ फेऱ्या सोडण्याची तयारी असताना मध्य-प्रदेश सरकारने अडसर निर्माण केल्याने भाविकांची गैरसोय झाली. खासगी वाहनचालकानी पैसे उकळले. त्यामुळे भाविकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.