

Nagpur Jail Security Issue
नागपूर: नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कपड्यांच्या साहाय्याने आत्महत्या करण्याची किंवा प्रयत्न करण्याची ही गेल्या चार वर्षांतील तिसरी घटना आहे. यानिमित्ताने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 54 वर्षीय कैद्याने अंडरवेअरच्या इलॅस्टिकचा वापर करून खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१५) घडली.
आत्महत्या करणाऱ्या कैद्याचे नाव तुळशीराम शिंदे असून, 2014 मध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलिसांनी त्याला खूनाच्या आरोपाखाली अटक केली होती. 2016 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
कोविड काळात कारागृहातील गर्दी टाळण्यासाठी सरकारने तात्पुरत्या सुटकेची सवलत दिली होती. याच पार्श्वभूमीवर शिंदे यालाही काही काळासाठी जेलमधून बाहेर जाण्याची संधी मिळाली. मात्र, नंतर पुन्हा त्याला सेंट्रल जेलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने परोल व फर्लोसाठी अर्ज केला, पण तो मिळाला नाही. मृत्यूपूर्वी शिंदे याला बारक क्रमांक ४ जवळील रंगकामाच्या गोदामात काम देण्यात आले होते. तेथेच त्याने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची दंडाधिकारी चौकशी सुरू असल्याची माहिती नागपूर सेंट्रल जेलचे अधीक्षक वैभव आगे यांनी दिली. दरम्यान,तुळशीराम शिंदे याचा कोणत्याही कुटुंबीयांशी संपर्क नव्हता, असे प्राथमिक तपासात उघड झाले.जेलमधून घरी फोन करण्याची परवानगी असतानाही त्याचे नातेवाईक त्याच्याशी बोलत नव्हते. त्यामुळे तो नैराश्यात गेला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या.
2021 मध्ये आरोपी रोशन शेख याने आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
2023 मध्ये कैदी शामराव शिंदे याने पैजाम्याचा वापर करून आत्महत्या केली.
2025 मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 54 वर्षीय कैद्याने अंडरवेअरच्या इलॅस्टिकचा वापर करून खिडकीला गळफास लावून आत्महत्या
या घटनांनी कारागृहातील सुरक्षेचा, कैद्यांच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापनाचा आणि मानवी संवेदनांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती धंतोली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक कृष्णा वाघ यांनी दिली.