

100th Divisional Theatre Conference
नागपूर : मागील दहा-पंधरा वर्षात डिजिटल युगामुळे तंत्रज्ञान खूप बदलले. त्याचा परिणाम नाटक, नृत्य यासारख्या परफार्मिंग आर्टवर झाला. आता अशावेळी नाट्यसंस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या असून त्यांना तालीम आणि कला सादरीकरणासाठी छोटी सांस्कृतिक संकुले उभारली जावी, असे आवाहन 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी केले.
सुरेश भट सभागृहात या नाट्य संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते शाहबाज खान, आ. अभिजित वंजारी, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, शलाका पवार, सागर कारंडे, भारत गणेशपुरे यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, उपाध्यक्ष उपक्रम भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, दीपक मते, संजय रहाटे, सहकार्यवाह दिलीप पोरके व इतर नियामक मंडळ, सर्व शाखा व मध्यवर्तीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जब्बार पटेल यांनी नाटक ही अद्भूत कला असल्याचे सांगत दुस-या भाषेतील नाटकांचे आदान-प्रदान वाढवावे, असे आवाहन केले.प्रारंभी पहलगाममधील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मनीष पाटील यांच्या ब्लॉसम डान्स अॅकॅडमीच्या बालकलाकारांनी गणेशवंदना सादर केली. यावेळी ‘संचित’ या गौरव विशेषांकाचे प्रकाशन, शुभदा फडणीस आणि विवेक रानडे यांचा गौरव करण्यात आला.
पहलगाम येथील दुर्दैवी घटनेमुळे समारंभात सहभागी होऊ न शकल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे संमेलनाला शुभेच्छा दिल्या. या पत्राचे वाचन अजय पाटील यांनी केले. हा केवळ एक सोहळा नसून शतकपूर्तीनिमित्त टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यातून नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशातून केले.
आ. अभिजित वंजारी यांनी लोककलावंत आणि लेखकांना लाडक्या बहिणी प्रमाणेच आधार, मानधन मिळाल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे आवाहन केले. अजय पाटील यांनी रंगभूमीसोबतच झाडीपट्टी, बालरंगभूमी यासारख्या उपक्रमांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या कलांना वाव देण्यासाठी नागपुरात सभागृह, तालमीची जागा असावी, तसेच मानधन वाढीचा मुद्दा शासनाकडे बैठक आयोजित करून मार्गी लावावा, अशी आ. अभिजीत वंजारी यांच्याकडे मागणी केली. सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केले तर आभारप्रदर्शन नरेश गडेकर यांनी केले.