

सांगली; पुढारी वृत्तसेवा : आयुष्य जसे दिसते, त्यापेक्षा त्याकडे वेगळ्या नजरने पाहणे, त्याच्या खोलात जाऊन ते नाटकाच्या स्वरूपात सादर करणे हे सध्या रंगकर्मीसमोर आव्हान आहे. आयुष्याकडे तिरकसपणे पाहून परंपरा समजून घेऊन त्यात बंडखोरी करणारे रंगकर्मी फार थोडेच आहेत, त्यामध्ये सतीश आळेकर यांचे नाव घ्यावे लागेेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केले.
अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समिती सांगलीच्या वतीने ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, रंगकर्मी सतीश आळेकर यांना डॉ. पटेल यांच्याहस्ते आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
डॉ. पटेल म्हणाले, केवळ नाटक करणे हे रंगकर्मीचे काम नसते, तर आपण नाटकातून कोणता विचार मांडला आणि आपण
रंगभूमीला काय दिले हे महत्त्वाचे असते. सतीश आळेकर यांनी बॅकस्टेजपासून काम करून जागतिक दर्जाचे नाटककार म्हणून सन्मान मिळविला आहे. नाटककारांनी परंपरा समजून घेऊन नंतर बंडखोरी केली पाहिजे. आयुष्याकडे तिरकस नजरेने पाहून त्यात खोलवर दडलेला अर्थ नाटकाच्ंया माध्यमातून उलघडून दाखविण्याचे काम आळेकर यांनी केले आहे. चौकटीबाहेर जावून नाटक लिहिणारे फार कमी असतात. तेंडूलकर, गिरीष कर्नाड, उत्पल दत्त या दिग्गज नाटकांबरोबर आळेकरांची गणना होते. त्यांच्या नाटकाचे प्रयोग अन्य भाषेत झाले. त्यांना मिळालेला हा उचित सन्मान आहे.
सत्काराला उत्तर देताना सतीश आळेकर म्हणाले, विष्णुदास भावे यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे रंगकर्मीना मिळणारा रंगभूमीचा प्रसाद आहे. पूर्वी अन्य भाषेत नाटके होती. परंतु विष्णुदास भावे यांनी नाटकाला रंगभूमीवर अवकाश मिळवून दिला. हा अवकाश वापरावयाचा कसा हे त्यांनी सांगितले. त्या काळातच महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहून त्या माध्यमातून विचार पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पण ते नाटक शंभर वर्षे काही स्टेजवर आले नाही. नाटक ही गोष्ट प्रवाही असते. याचे भान विष्णुदास भावे यांनी दिले. नाटकातील साधनांचा आदरपूर्वक स्वीकार करून नंतर त्यात बदल करता येतो. नाटक कलेचा व्यवसाय होऊ शकतो, हे भावे यांनी दाखवून दिले. त्यामुळे आज मराठी नाटकाला देशभर मान मिळत आहे.
अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अविनाश सप्रे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी स्थानिक रंगकर्मी चंद्रकांत धामणीकर व मुकूंद पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला. कार्यवाह विलास गुप्ते यांनी आभार मानले. यावेळी विनायक केळकर, मेधा केळकर, आनंदराव पाटील, बलदेव गवळी, विवेक देशपांडे, बीना साखरपे, भालचंद्र चितळे उपस्थित होते.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, अनेक दिग्गज रंगकर्मींना विष्णुदास भावे गौरव पदक मिळाले; परंतु या यादीमध्ये बंडखोरी करणारे आणि आयुष्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने नाटकातून मांडणारे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचे नाव राहिले आहे. त्यामुळे संयोजकांनी मरणोत्तर पुरस्कार देऊन तेंडुलकरांचा सन्मान करावा.
सतीश आळेकर म्हणाले, कोरोनाच्या अगोदर शंभरावे नाट्यसंमेलन होणार होते. त्याचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल होते; परंतु ते काही झाले नाही. त्यानंतर नाट्यसंमेलनाबाबत संयोजकांमध्ये वाद सुरू झाले. त्यांनी तो वाद लवकरात लवकर मिटवून शंभरावे नाट्यसंमेलन घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.