

Shyam Manav challenge Dhirendra Shastri
नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पुन्हा एकदा जाहीर आव्हान दिले आहे. शास्त्री यांनी समितीने ठरवून दिलेल्या अटीनुसार त्यांच्याकडे असलेली दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवल्यास त्यांना ८० लाख रुपये दिले जातील, अन्यथा अनामत रक्कमही जप्त होईल, अशी घोषणा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी पत्रपरिषदेत केली. अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित बुवा तेथे बाया व्याख्यानाच्या निमित्ताने ते बोलत होते.
प्रा. मानव म्हणाले, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्यांच्यातील दिव्यशक्तीद्वारे 'अंनिस'ने आयोजित केलेल्या दोन मुख्य चाचण्या उत्तीर्ण करून दाखवाव्यात. १० व्यक्तींना समिती पुढे उभे करेल. धीरेंद्र शास्त्री यांनी त्या व्यक्तींचे नाव, वडिलांचे नाव, वय आणि मोबाइल सांगावे, याशिवाय एका सीलबंद पाकिटात आधीच ठेवलेले नंबर अचूक सांगायचे, तसेच शेजारच्या खोलीत ठेवलेल्या दहा वेगवेगळ्या वस्तूंची ओळख शास्त्री यांनी त्यांच्या दिव्यशक्तीने पटवून कागदावर लिहून द्यायची आहे.
या दोन्ही चाचण्यांमध्ये शास्त्री ९० टक्केही अचूक असल्यास त्यांना ८० लाख रुपये दिले जातील. मात्र, अपयशी ठरल्यास 8 लाखांची अनामत रक्कम जप्त होईल . नागपुरात या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाईल. देखरेख ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या संमतीने पाच सदस्यांची समिती नेमली जाईल, असेही श्याम मानव म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अंधश्रद्धा निर्मूलनाएवजी ती वाढल्याचा आरोप मानव यांनी केला. अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतच्या २२ सभा झाल्या. मात्र, आता हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळेच अशोक खरात यांच्यासारखे भोंदू समाजात वाढल्याचे सांगितले. दरम्यान,आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सहकुटुंब धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेणे गंभीर असल्याचेही सांगितले.