

नागपूर : नागपूर विभागासोबतच राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी, शिक्षक नियुक्ती प्रकरणात विशेष तपास पथकाने बुधवारी (दि.२५) आणखी एका शिक्षण संस्था चालकाला अटक केली. ओंकार भाऊराव अंजीकर (वय ४६, रा. बाळाभाऊपेठ कमाल चौक) असे या संस्था चालकाचे नाव आहे. ३० शिक्षकांचा बनावट आयडी काढून त्यांची नियुक्ती वेतन व थकबाकी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
अंजीकर याची शांती निकेतन शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या गुलशन नगर येथे जय हिंद विद्यालय, महात्मा फुले उच्च प्राथमिक शाळा व यादव नगर येथे एस के बी उच्च प्राथमिक विद्यामंदिर या नावाने शाळा आहेत. २०१९ पासून त्याने वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षक निलेश वाघमारे याच्या मदतीने ३० बोगस आयडी तयार केले. संबंधितांकडून लाखो रुपये घेतले. या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता पोलीस उपयुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. नागपूर विभागातील हा बोगस शालार्थ आयडी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती घोटाळा पुढे आल्यानंतर उपसंचालक उल्हास नरड व पराग पूडके यांना अटक करण्यात आली होती. यावेळी अंजीकर याने चौकशीत आपला काहीही संबंध नसल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, आता सखोल तपासात त्यांचा थेट संबंध असल्याचे उघड होताच एसआयटीने अटक केली. यापूर्वी गोंदियातील राजश्री शिक्षण संस्थेचे संचालक चरण नारायण चेटुले, भंडारा येथील राजू केवलराम मेश्राम आणि नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील भाजप नेते व संस्थाचालक दिलीप धोटे यांना अटक करण्यात आली. किमान २५ शिक्षण संस्था संचालक एसआयटीच्या रडार असल्याची माहिती आहे.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पोलिस, सायबर, एसआयटीच्या माध्यमातून सागर गणेशराव भगोले (वय ३५, रा. बालाजी नगर मानेवाडा रोड नागपूर), भारत शिवदास ढवळे (वय ५५, रा, हनुमान नगर वानाडोंगरी), उल्हास कवडुजी नरड (वय ५४, रा.शिर्डींनगर,मानेवाडा), सुरज पुंजाराम नाईक (वय ४०, रा.महालक्ष्मी नगर न्यू नरसाळा), लक्ष्मण उपासराव मंघाम (वय ४७, रा. आकाशी लेआउट दाभा), अनिल वसंतराव पारधी (वय ६१, रा. तात्या टोपे नगर, नागपूर), चिंतामण गुलाबराव वंजारी (वय ५७, भाऊसाहेब सुर्वे नगर), वैशाली जगन्नाथ जामदार (वय ५१, रा. शंभू नगर, छत्रपती संभाजी नगर) व दिलीप भास्करराव धोटे (वय ६२, रा. ब्राह्मणी फाटा कळमेश्वर नागपूर) अशा दहा जणांना अटक झाली आहे. भगोले, ढवळे, नरड नाईक यांना या प्रकरणात आतापर्यंत जामीन मिळाला तर इतर मध्यवर्ती कारागृहात आहेत.