
Shalarth ID Fraud SIT Investigation Nagpur
नागपूर: नागपूर भागातच नव्हे, तर राज्यभरात गाजलेल्या बनावट शालार्थ आयडी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरती घोटाळा प्रकरणात अखेर एसआयटी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने या एसआयटीचे प्रमुख असतील. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
अनेक दिवस राजकीयदृष्ट्या देखील या पोलिस, सायबर तपास सुरू असताना एसआयटी किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी केली जात होती. दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह नऊ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे. या प्रकरणात सदर व सायबर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, शिक्षक पराग पुडके, निलेश मेश्राम, भारत ढवळे, सुरज नाईक, संजय बडोदकर, निलेश राऊत यांना अटक झाली आहे.
न्यायालयीन कोठडीनंतर नुकताच या प्रकरणात जामीनही मिळाला आहे. या घोटाळ्यातील सर्वाधिक लाभार्थी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील असल्याचे आतापर्यंत तपासात पुढे आले आहे. मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एसआयटीकडे ही आता तपासाची जबाबदारी आल्याने त्यांना या तपासाचे आव्हान असणार आहे.
तपासात कुणाचा सहभाग एसआयटीत सहाय्यक पोलीस आयुक्त मेश्राम, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, अभिजीत चिखलीकर, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक लामतुरे, दत्तात्रय निनावे, अमोल दोदलावार, संजय यादव जितेंद्र पठाडे यांचा समावेश आहे.
मात्र, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सायबर आणि एसआयटी अशा दोन्ही जबाबदारींना एकच अधिकारी कसा न्याय देतील. याबाबतीत प्रश्नचिन्ह कायम आहे. शिक्षण विभागाचे कुणीही अधिकारी यात नाही. आज यासंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही शिक्षण विभागातील तज्ज्ञांची मदत घ्या, असे पत्र पोलीस आयुक्तांना दिले आहे.