नागपूर : नागपुरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानक देशाच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. पूर्व-पश्चिम, उत्तर दक्षिण जोडणारे स्थानक संवेदनशील म्हणून ओळखले जाते. परंतु, या स्थानकावरील सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. दुरंतो प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वरून आधी केवळ दुरंतो गाडी सुटत होती. मात्र, आता कॉटन मार्केटच्या दिशेने पूर्वेकडील रेल्वे स्थानक विस्ताराचे काम सुरू असल्याने ही सुरक्षा भगवान भरोसे असल्याचे चित्र आहे.
नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर टेकडी रोड बाजूने किंवा संत्रा मार्केट बाजूने देखील कुणाचीही सुरक्षा तपासणी होत नाही. सामान सुरक्षा तपासणी करण्याचे बॅगेज, लगेज स्कॅनर देखील नावापुरते लागलेले आहे. या ठिकाणी कोणीही खबरदारीने सुरक्षा तपासणी करीत नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. एखादी घटना घडली किंवा अलर्ट आला. तरच रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा असल्याचे पाहायला मिळते. बाकी काळात नागपूर रेल्वे स्थानक अजनी रेल्वे स्थानक किंवा इतवारी रेल्वे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची व गाड्यांची ये - जा असताना पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. याबाबतची तक्रार 'पुढारी'शी बोलताना अनेकांनी केली.
तर दुसरीकडे रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलिसांच्या दृष्टीने आम्ही वेळोवेळी आवश्यक तपासणी करतो, असा दावा करण्यात आला. मात्र, आज रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांवर थेट फलाटावर झालेल्या या हल्ल्याने मध्यवर्ती रेल्वे स्थानकाची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. देशविघातक शक्तीकडून घातपातची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या प्रमाणावर गांजा, अंमली पदार्थ, दारूची तस्करी नागपूर रेल्वे स्थानकामार्गे सुरू आहे. इतकेच नव्हे तर नागपुरातील मॉल, मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी देखील सुरक्षेच्या दृष्टीने फारशी खबरदारी घेतली जात नाही.
सध्या दुर्गोत्सव लवकरच धम्मचक्र प्रवर्तन दिन व यानंतर दिवाळीचा काळ लक्षात घेता मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्थानक व गर्दीच्या ठिकाणावर नागपुरातील विमानतळाच्या धर्तीवर सुरक्षा यंत्रणा प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक भक्कम करण्याची मागणी या निमित्ताने पुढे आली आहे. शासन, प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असताना सर्वसामान्य जनतेच्या, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोण काळजी घेणार? हा प्रश्न या निमित्ताने अनुत्तरित दिसत आहे.