नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ऑडी कारने अनेकांना धडक दिली त्यावेळी स्वतः कारचा मालक संकेत बावनकुळे कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता, असे पोलीस सांगत असताना कारचालक अर्जुन हावरे व रोहित चिंतमवार यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. मात्र संकेत बावनकुळेची वैद्यकीय तपासणी का केली गेली नाही? त्याच्यावर कोणतीच कारवाई का केली गेली नाही? नंबर प्लेट का काढून ठेवण्यात आली? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी पोलिसांवर केली. या प्रकरणी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद केला. यावेळी बोलताना पुढे त्या म्हणाल्या, पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना अपघातामध्ये असणाऱ्या तरुणांनी मद्य व बीफ कटलेट घेतले यासंबंधीचे बिल असल्याचा दावा केला, हे बिल पोलिसांनी सार्वत्रिक करावे अशी मागणी केली. यानंतर बुधवारी (दि.11) या प्रकरणात अधिकच वातावरण तापले. स्वतः बीफ खाणारे लोक आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी सांगतात असा आरोपसुद्धा राऊत यांनी केल्यानंतर भाजप आणि शिंदेसेनेतून राऊत यांच्यावर प्रत्यारोप करण्यात आले. मात्र नागपुर पोलिसांनी बिलामध्ये असा कुठलाही उल्लेख नसल्याचा खुलासा केला. ही घटना घडली त्यावेळी चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. संकेत बावनकुळे त्यावेळी घटनास्थळी नसल्याने काही तासानंतर जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांना बोलावून बयान नोंदविण्यात आले. कारचालकाला जामीन देण्यात आला असला तरी आमच्यावर कुठलाही राजकीय दबाव यासंदर्भात नाही. सीसीटीव्हीची तपासणी झालेली असताना जे- जे काही पुरावे पुढे आले आहेत त्यानुसार कारवाई सुरू आहे. कुणालाही अभय देण्याचा प्रश्न नाही अशी माहिती उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.
यासंदर्भात आपण कालही जे सांगितले त्यावर ठाम आहोत. कार अर्जुनच चालवित होता संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या शेजारी बसून होता. याचा त्यांनी पुनरुच्चार केला. गाडी त्यांच्या नावावर असली तरी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीकडे लायसन्स किंवा इतर कागदपत्रे नसल्यासच कार मालकाचा प्रश्न येतो असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरास स्पष्ट केले. दरम्यान, पोलिसांनी योग्य तो तपास करीत असून वास्तव बाहेर आले आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेली ऑडी कार अर्जुन हावरे हाच चालवित होता. संकेत बावनकुळे कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता,आमच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही, कायद्यानुसार आणि सीसीटीव्ही व उपलब्ध पुराव्यानुसार पोलीस तपास सुरू असून कुणालाही वाचविण्याचा प्रयत्न केला जात नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. दिवसभर आरोप प्रत्यारोप सुरू असताना बिलात बीफचा उल्लेख नसल्याचा दावा केला.
या घटनेवरून बावनकुळे यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केला आहे. दुसरीकडे स्वतः बावनकुळे पश्चिम विदर्भातील विधानसभा निवडणूक संदर्भात दौऱ्यावर उद्या रवाना होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संकेत बावनकुळे यांनी अद्यापही माध्यमांशी संवाद साधलेला नाही. पोलिसांकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येच शिवसेना आणि काँग्रेसमध्ये या संदर्भात मतभिन्नता स्पष्ट होत आहे. दुसरीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी पोलीस तपास योग्य रीतीने करीत आहेत. या घटनेतून नेते, नेतापुत्रांनी बोध घ्यावा, राजकारण कोणीही करू नये, दोषींवर कारवाईसाठी आपण एकटेच पुरेसे आहोत असा टोलाही आज यासंदर्भात सुषमा अंधारे यांचे नाव न घेता लगावला आहे. या पार्श्वभूमीवर लाहोरी हॉटेलमध्ये बीफ मिळते का असा प्रश्न उपस्थित केला जात असून या संदर्भात बदनामी केल्याच्या आरोपावरून हॉटेल व्यवस्थापनातर्फे तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अपघातातील तक्रार नोंदविणारे फिर्यादी जितेंद्र शिवाजी सोनकांबळे यांच्यावरही राजकीयदृष्ट्या दडपण असल्याची चर्चा जोरात आहे.
या अपघातामध्ये असणारी कार माझ्या मुलाच्या नावावर आहे, अशी कबुली देत पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून योग्य ती कारवाई करावी, कुणालाही वेगळा न्याय नको असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. या अपघातात सुदैवाने कुणालाही इजा, प्राणहानी झाली नाही याबद्दल देवाचे आभारही त्यांनी मानले. मात्र,विरोधक आरोप करणारच, पोलिस यंत्रणेवर कुणाचा दबाव नाही,मी कुणाशी बोललो नाही. कायदा सर्वाना सारखाच असतो असेही त्यांनी सांगितले.