

Nagpur Umred family death in Car Accident
नागपूर: पुणे येथून नागपूरकडे परत येत असताना समृद्धी महामार्गावर एका भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. चालकाची प्रकृती देखील गंभीर असून वाशीम येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जयस्वाल कुटुंबातील सर्व मृत नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी आहेत. हा भीषण अपघात गुरूवारी (दि.३) सांयकाळी ७ च्या दरम्यान झाला.
समृद्धी महामार्गावर वनोजा-कारंजा दरम्यान पुण्याहून नागपूरच्या उमरेडला जात असलेल्या कारचे महामार्गावरील चॅनल क्र. २१५ वर नियंत्रण सुटल्यामुळे कार डिव्हायडरला धडकली आणि ही दुर्घटना घडली.
पुणे येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी ते गेले होते. गुरुवारी (दि.३) रात्री वाशिम परिसरात त्यांची भरधाव कार अनियंत्रित झाल्याने हा भीषण अपघात घडला. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये वैदेही जयस्वाल (वय 25), माधुरी जयस्वाल (वय 52), राधेश्याम जयस्वाल (वय 67) आणि संगीता जयस्वाल (वय 55) अशा चार जणांचा समावेश आहे. कार चालक चेतन हेलगे (वय 25) गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे अधिक उपचारासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाची रेस्क्यू टीम, पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मंगरुळपिर पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.