

एकीकडे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर येणार, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हेच जनतेच्या मनातील दावेदार असतील. असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर लागलीच काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे तीनही पक्षांचे नेते ठरवणार संजय राऊत किंवा नितीन राऊत ठरविणार नाहीत असा पलटवार केला आहे.
सरकार महाविकास आघाडीचेच येणार मात्र मुख्यमंत्री कोणाचा हे आम्ही ठरवणार नाही. किंबहुना कोण कुठल्या जागा लढविणार हे देखील माध्यमांशी चर्चेत बोलून दाखवण्याचा नवीनच प्रकार पुढे आला आहे असे टीकास्त्र सोडले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दक्षिण नागपूर विधानसभा व रामटेक विधानसभा शिवसेनाच लढेल असा दावा दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यात केला यावर ते उत्तर देत होते. आम्ही केलेल्या सर्वेक्षणात विदर्भात काँग्रेसला चांगली संधी आहे. नव्या चेहऱ्यांना 50 टक्के संधी दिली पाहिजे यावर आपण ठाम आहोत.
चांगल्या कंपनीकडून अशा प्रकारच्या सर्व्हे केला गेल्यास चित्र अधिक स्पष्ट होईल. असे स्पष्ट करतानाच त्यांनी मुंबईत किंवा मराठवाड्यात केलेल्या सर्वेचे आणि नागपुरात येऊन त्यांनी केलेल्या मागणीचे संदर्भात बोलताना त्यांनी काचेचे घर असणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये असा सबुरीचा सल्लाही दिला. दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असताना संजय राऊत यांनी वेगळी भूमिका आणि तीही माध्यमांजवळ व्यक्त करू नये असे सांगितले. एकंदरीत महाविकास आघाडीतही मुख्यमंत्री पदावरून तिकीट वाटपापूर्वीच वाद वाढण्याची चिन्ह आहेत.