

Harshvardhan Sapkale warning
नागपूर : महात्मा गांधी यांच्या छातीत गोळ्या घालणारी औलाद अजून जिवंत असून हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळ्या टोपीतून आला आहे. परंतु राहुल गांधींच्या केसाला जर धक्का लावाल, तर याद राखा, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपच्या एका प्रवक्त्याने छातीत गोळ्या घालण्याची जाहीर धमकी दिली आहे. त्याचा तीव्र शब्दात धिक्कार केला. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते ते एका व्यक्तीचे नाही. तर प्रवृत्तीचे दहन असते. संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत. त्याचा धिक्कार व दहन करावे, अशी आमची अपेक्षा असल्याचेही सपकाळ यांनी म्हटले आहे.
यावेळी तुषार गांधी म्हणाले की, लोकशाही व संविधान व लोकांच्या सत्याग्रहाचा अधिकार यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून हा जनतेचा आक्रोश आहे. दीक्षाभूमी येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रेची सुरुवात झाली.
यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, सुनिल केदार, अनिस अहमद, राजेंद्र मुळक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, खा. नामदेव किरसान, खा. शामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नाना गावंडे, किशोर कान्हेरे, प्रवक्ते अतुल लोंढे, नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस, संदेश सिंघलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.