

Nagpur Petrol Pump Digital Payment Banned |
नागपूर : देशासमोर असलेली युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता 10 मे पासून पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे शुक्रवारी सकाळपासून शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट म्हणजेच फोन पे, गुगल पे, पेटीएम, डेबिट क्रेडिट कार्ड, असे कुठलेही ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जात नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने ऑनलाइन पेमेंट न घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, शुक्रवाही काही विशेषतः एचपीसीएलच्या पेट्रोल पंपावर ऑनलाइन नको, रोखीने व्यवहार करा असे वाहनचालकांना सांगितले गेले. याचा सर्वसामान्यांना त्रास झाला. यावर आम्ही निर्णय मागे घेतल्याचे कालच जाहीर केले. आज सर्वर अडचणीमुळे ही समस्या उद्भवली असू शकते, असे असोसिएशनने स्पष्ट केले. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील आमची रक्कम गोठविली जात असल्याने ऑनलाइन बंदचा निर्णय घेण्यात आला. देशभरात डिजिटल व्यवहार कोविड काळानंतर मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असून काही बनावट व्यवहारांमुळे पेट्रोल पंप मालक, चालकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे.