

नागपूर - नागपुरात सध्या 2400 च्या जवळपास पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्यापैकी चार जण पाकिस्तानात परतले आहेत. एक हजारावर पाकिस्तानींकडे दीर्घकालीन विजा आहे. अनेक जण वैद्यकीय उपचारासाठी दीर्घ मुदतीच्या विसावर नागपुरात आले आहेत. यातील बहुतांशी लोक जरीपटका, मोमीनपुरा, जाफर नगर, हसनबाग, ताजबाग आदी परिसरात वास्तव्यास आहेत.
नागपुरात वास्तव्यास असलेले सुमारे 13 नागरिक मुस्लिम तर इतर अन्य समाजाचे आहेत. दरम्यान, पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असलेल्या परिसरात सशस्त्र पोलिसांची नजर ठेवण्यास सांगण्यात आले असून खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील विविध भागात पोलिसांची नाकाबंदी आणि बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. एकीकडे राज्य शासनातर्फे राज्यातून कोणीही पाकिस्तानी बेपत्ता नसल्याचा दावा करण्यात आला असला तरी राज्य गुप्तचर गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत 75 वर्षांपूर्वी फाळणीनंतर आलेले शेकडो पाकिस्तानी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अर्थातच सध्या ते कोठे आहेत, यातील काहींचा मृत्यू झाला की काय अशी शंका आहे. कारण व्हिसा मध्ये दिलेल्या पत्त्यावर ते आढळले नाहीत एक तर त्यांनी निवासस्थान बदलले असावे किंवा त्यांचा मृत्यू झाला असावा असेही सांगण्यात येते. अल्प मुदतीच्या विसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांना मुदतीत परत पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्याच्या बाबतीत सध्या कुठलेही निर्देश नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.