

Nitin Gadkari On Neglecting Old Party Workers:
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमधील 'इनकमिंग'च्या वाढत्या प्रवाहावर आणि जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या दुर्लक्षावर स्पष्ट आणि कडक शब्दात टीका केली आहे. जुन्या कार्यकर्त्यांची कदर न केल्यास पक्ष जेवढ्या वेगाने यशाच्या शिखरावर चढला आहे, त्याच वेगाने खाली कोसळेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला दिला आहे.
नागपुरी भाषेत बोलताना गडकरींनी कार्यकर्त्यांच्या परिस्थितीचे वर्णन एका खास उपमेतून केले. ते म्हणाले, "चांगला माणूस असतो 'घरकी मुरगी दाल बराबर', त्यामुळे बाहेरचा 'चिकन मसाला सावजीचा' चांगला लागतो."
या उपमेतून त्यांनी पक्षात अनेक वर्षे काम केलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना साधे आणि नेहमीचे मानले जाते, तर निवडणुकीच्या तोंडावर बाहेरून येणाऱ्यांना ('इनकमिंग' झालेले) जास्त महत्त्व दिले जाते, या वस्तुस्थितीवर बोट ठेवले.
पक्षाच्या सध्याच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत गडकरींनी नेतृत्वाला खडसावले. ते म्हणाले, "तुम्ही नेतृत्व करता. जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली, तर जेवढ्या जोराने वरती चाललाय तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा."
सध्या देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात भाजपमध्ये इतर पक्षातून मोठ्या संख्येने लोक प्रवेश करत आहेत. या वाढत्या 'इनकमिंग'मुळे जुन्या, संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत असलेल्या असंतोषाला गडकरींनी आपल्या वक्तव्यातून वाचा फोडली आहे. नेतृत्वाने तात्काळ या समस्येकडे लक्ष द्यावे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम पक्षाला भोगावे लागतील, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. गडकरींचे हे वक्तव्य भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचे आणि जुन्या-नव्या वादाचे स्पष्ट संकेत देणारे मानले जात आहे.