

नागपूर - विदर्भातील कृषी क्षेत्रापुढे अनेक आव्हाने असली तरीही प्रत्येक समस्येतून मार्ग काढणे देखील शक्य आहे. विशेषतः सरकारी संस्थांमधील संशोधकांनी रोपवाटिकांचे योग्य मार्गदर्शन केले आणि रोगमुक्त रोपांची निर्मिती केली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. या माध्यमातून नागपूरची जागतिक ओळख असलेला संत्रा देखील विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग होऊ शकतो, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज शनिवारी जुलै रोजी व्यक्त केला.
भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थानतर्फे अमरावती मार्गावरील कार्यालयात केंद्र सरकारच्या क्लीन प्लांट उपक्रमांतर्गत (रोगमुक्त रोपे) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्राचे संचालक दिलीप कुमार घोष, मुख्य शास्त्रज्ञ ए.के. दास, श्री. सुधीर दिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत आसाम, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूर यासारख्या १२ राज्यांमधील अधिकारी, अभ्यासक सहभागी झाले होते.
गडकरी म्हणाले, ‘विदर्भातील शेतीमध्ये पाण्याचे नियोजन, माती परीक्षण याबाबतीत सजगता बाळगण्याची गरज आहे. परंतु, या सर्वांमध्ये कृषी विकासात रोगमुक्त रोपांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून यासंदर्भात काम होत आहे. पण, विदर्भाच्या गरजा लक्षात घेऊन त्या आधारावर संशोधन होणे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. सरकारी संस्थांनी चांगली, रोगमुक्त, गुणत्तापूर्ण रोपे आणि बियाणे तयार करावी. शेतकरी आणि रोपवाटिकांचे मार्गदर्शन करावे. चांगली रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे. त्यातून कमी गुंतवणुकीत अधिक उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना मदत होणार असून महाराष्ट्रात रोपवाटिकांच्या संदर्भातील कायद्यात नवीन सुधारणा झाल्याचाही आवर्जून उल्लेख केला.