Nitin Gadkari
नागपूर : "माझ्या मेंदूची किंमत महिन्याला २०० कोटी आहे. माझ्याकडे पैशांची अजिबात कमतरता नाही आणि मी कधीही खालच्या पातळीवर जाणार नाही,” असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी इथेनॉल धोरणाबद्दलच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर केले. माझ काम आणि प्रयोग पैसे कमावण्यासाठी नसून ते शेतकरी आणि त्यांच्या कल्याणासाठी आहेत, असंही गडकरी म्हणाले.
नागपूरमध्ये ॲग्रिकोस वेल्फेअर सोसायटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, "तुम्हाला काय वाटतं, मी हे पैशांसाठी करतोय? मला प्रामाणिकपणे पैसे कसे कमवायचे हे माहित आहे. मी कुठलाही ‘व्हील-डीलर’ नाही. राजकारण्यांना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी लोकांना एकमेकांविरुद्ध लढवायची कला चांगलीच अवगत आहे. मागासलेपण हेच एक राजकीय साधन बनले आहे, असेही त्यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले की, त्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाची, विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भ भागातील शेतकऱ्यांची, खूप काळजी वाटते. "माझ्याकडेही कुटुंब आणि घर आहे. मी काही साधू नाही, मी एक राजकारणी आहे. पण मला नेहमीच विदर्भात १०,००० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची लाज वाटते. जोपर्यंत आपले शेतकरी समृद्ध होत नाहीत, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही," असे ते म्हणाले.
नितीन गडकरींनी त्यांच्या मुलाच्या उद्योगांबद्दलही सविस्तर सांगितले. ते म्हणाले, "मी फक्त त्याला कल्पना देतो. माझ्या मुलाचा आयात-निर्यात व्यवसाय आहे. त्याने नुकतेच इराणमधून ८०० कंटेनर सफरचंद मागवले आणि इथून १००० कंटेनर केळी पाठवली." ते पुढे म्हणाले, "माझ्या मुलाने गोव्याहून माशांचे ३०० कंटेनर घेतले आणि ते सर्बियाला पुरवले. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये दूध पावडर बनवणारा कारखानाही सुरू केला आहे. तो १५० कंटेनर अबू धाबी आणि इतर ठिकाणी पाठवतो." गडकरी म्हणाले की, त्यांचा मुलगा आयटीसीच्या (ITC) सहकार्याने २६ तांदळाच्या गिरण्याही चालवतो. "मला पाच लाख टन तांदळाच्या पिठाची गरज आहे, म्हणून तो गिरण्या चालवतो आणि मी ते पीठ विकत घेतो," असे सांगत त्यांनी कृषी क्षेत्रात व्यावसायिक बुद्धिमत्तेने कशा प्रकारे संधी निर्माण केल्या जाऊ शकतात याची उदाहरणे दिली.