

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पक्ष प्रवेशाचे फटाके फुटणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात माण - खटावचे नेते प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शहाजी क्षीरसागर यांचे पक्ष प्रवेश होत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंदआबा पाटील आणि खा. नितीनकाका पाटील यांच्या पुढाकाराने हे प्रवेश होत असून, त्याला अजितदादांनी रविवारी हिरवा कंदिल दिला.
भारतीय जनता पक्ष स्वबळावर जिल्हा परिषदेची सत्ता आणण्याची तयारी करत आहे. सातत्याने भाजपने एकला चलोचा नारा देत जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता आणण्याचा चंग बांधला आहे. त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटही पुढे सरसावला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई ........ यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यानंतर प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, सुनील माने यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरु होती पण त्याला मुहूर्त लागत नव्हता. आता मात्र सर्व तयारी पूर्ण झाली असून माण - खटावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी व एकजुटीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना राष्ट्रवादीत पुन्हा घेतले जाणार आहे. प्रभाकर देशमुख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने अजित पवार गट माण तालुक्यात आणखी चार्ज होईल, असे पक्षाचे म्हणणे आहे. तर घार्गेंच्या अपक्ष प्रवेशाचा खटावमध्ये फायदा होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते.
सुनील माने हे पहिल्यापासूनच अजित पवारांच्या जवळचे मानले जायचे. मात्र, सुनील माने यांनी बाळासाहेब पाटील यांच्यासोबत राहणे पसंत केले. नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना सुनील माने व त्यांचा गट अजितदादांशी सलगी करु पाहत आहे. औंध येथे सुनील माने यांनी अजितदादांची भेट घेतली होती. वाईत रविवारी शहाजी क्षीरसागर व संभाजीराव गायकवाड यांनी येवून अजितदादांशी चर्चा केली. या भेटीत नोव्हेंबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात तारीख देण्याचे निश्चित करण्यात आले. या वेळी मकरंद आबा व नितीनकाका यांनीही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सगळे पक्षप्रवेश घेतले पाहिजेत, असे अजितदादांना सांगितले.
नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना नोव्हेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पक्ष प्रवेशाची दुसरी दिवाळी सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपच्या वाढत्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे आहेत.