आम्हाला शिकवू नका; अजित पवार समर्थक भाजपवर संतापले

Maharashtra politics | शहराध्यक्ष प्रशांत पवार यांचा इशारा
Nagpur, NCP
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवणुकीपूर्वी महायुतीत वादाची ठिणगी पडू लागली आहे. आम्ही लोकसभेला प्रामाणिक काम केले. आता कोणाचा झेंडा घेवून प्रचार करावा, हे आम्हाला कोणी शिकवू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज (दि.८) पत्रकार परिषदेत दिला.

भारतीय जनता पक्ष नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांनी पत्रपरिषद घेवून नागपूर शहर व ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील सर्व 12 जागांवर दावा केला आहे. मात्र, बंटी कुकडे यांना कदाचित माहिती नाही की, महायुतीच्या बैठकीत असा निर्णय झाला होता की, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जिंकत नाही, अशा ठिकाणी म्हणजेच काटोल, पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल. यानंतरही शहर अध्यक्ष कुकडे कोणाला विचारून शहरातील 6 जागांवर दावा करीत आहेत, असा सवाल पवार यांनी केला. वरिष्ठ भाजप नेत्यांशी चर्चा न करता निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने नागपूर शहरात घरोघरी जावून त्यांचा प्रचार केला. गडकरी यांच्या निवडून येण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही वाटा राहिला आहे, हे कुकडे यांनी विसरू नये. आम्ही महायुतीत भाजपचा झेंडा घेत प्रचारासाठी आलो नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. राज्यात भाजप 110 जागांवर लढणार तिथे आम्ही पूर्ण ताकदीने काम करू, भाजपाचा उमेदवार निवडून आणू ,ज्या ठिकाणी शिंदे गट उमेदवार असेल, त्या ठिकाणी सुध्दा ताकद उभी करू,परंतु ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल. त्या ठिकाणी शिंदे गट व भाजप यांनी प्रचार करून महायुतीचा धर्म पाळावा.

काटोल, पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे. जी जागा भाजप जिंकू शकत नाही. त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुरूवातीपासून दावा राहिला आहे. ही बाब अति उत्साही नेत्यांनी विसरू नये. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक राजेश माटे, उत्तर अध्यक्ष राकेश बोरिकर, उपाध्यक्ष सुखदेव वंजारी, विद्यार्थी शहराध्यक्ष विश्वजीत तिवारी, हिंगणा तालुकाध्यक्ष बिरू सिंग तोमर, उपाध्यक्ष निलिकेश कोल्हे, मिडिया अध्यक्ष अभिनव फटिंग उपस्थित होते.

Nagpur, NCP
नागपूर मध्यवर्ती रेल्वे, बस स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा रामभरोसे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news