Nagpur Crime | सुनेच्या खुनाने अंधश्रद्धेचा काळा चेहरा उघड; अंनिसचे पथक घटनास्थळी दाखल

नागपूर येथील यशोधरानगर परिसरात जादूटोणा केल्याच्या संशयाने एका सासऱ्याने सुनेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून केला खून
Nagpur Black Magic Suspicion Case
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपूर पथकाने घटनास्थळी भेट दिली Pudhari
Published on: 
Updated on: 

Nagpur Black Magic Suspicion Case

नागपूर : नागपूर येथील यशोधरानगर परिसरात जादूटोणा केल्याच्या संशयाने एका सासऱ्याने आपल्या सुनेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. लक्ष्मी रविशंकर पाली (४२) यांचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपूर पथकाने घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, नत्थूमल भगवान पाली (वय ७२) याचा मुलगा रविशंकर याचे २०१९ मध्ये निधन झाले होते. मुलाच्या मृत्यूमागे सुनेने जादूटोणा केल्याचा संशय नत्थूमलच्या मनात होता. याच संशयातून सासरा-सुनेमध्ये वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Nagpur Black Magic Suspicion Case
Nagpur Crime News : नागपूर हादरले! जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याने केला सुनेचा कुऱ्हाडीने निर्घृण खून

१२ सप्टेंबर रोजी पुन्हा वाद पेटला आणि संशयाने विवेकाचा अंत केला. नत्थूमलने लक्ष्मी यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मी यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर नत्थूमलने जवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला बाहेर काढून उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अंधश्रद्धेला थारा नको; अंनिसचे पथक थेट घटनास्थळी

घटनेची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपूर पथकाने घटनास्थळी भेट दिली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीय तसेच परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जादूटोणा, करणी किंवा अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट केले. परिसरात अशा प्रकारच्या घटना, अफवा किंवा अंधश्रद्धेशी संबंधित प्रकाराची माहिती असल्यास समितीशी संपर्क साधावा आणि माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन करण्यात आले.

Nagpur Black Magic Suspicion Case
Nagpur Crime | प्रेमसंबंधातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; प्रियकराला अटक

जादूटोणा सिद्ध करा, पुरस्कार मिळवा!

जादूटोणा अस्तित्वात असल्याचे कोणी सिद्ध केल्यास समितीने पुरस्कार ठेवला आहे; मात्र आजपर्यंत हा पुरस्कार कोणीही मिळवलेला नाही, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अंधश्रद्धेच्या संशयावरून एखाद्याला मारहाण करणे, छळ करणे किंवा त्याचा जीव घेणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी विवेक, विज्ञान आणि कायद्याचा आधार घ्यावा, असे आवाहन समितीने केले.

यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुनील भगत, जिल्हा सचिव गौतम पाटील, शाखा सचिव कमलेश सतदेवे, राज्य विभागीय सदस्य देवयानी भगत, शाखा उपाध्यक्ष शोभा पाटील, शाखा कार्याध्यक्ष वर्षा सहारे, शारदा मोटघरे आणि अरविंद तायडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेने पुन्हा एकदा अंधश्रद्धा, जादूटोणा आणि करणीच्या अफवांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news