

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून “आमदार मोजतात पैसे, शेतकऱ्यांसाठी नाही पैसे!”, “सातबारा कोरा करा नाहीतर खुर्च्या खाली करा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
विरोधकांनी गळ्यात कापसाच्या माळा घालून आंदोलन केले. कापूस आणि सोयाबीनला भाव नाही, कर्जमाफी मिळत नाही, शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे, अशा मुद्द्यांवर त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीवरून अधिवेशन गाजले होते; तर दुसऱ्या दिवशी शेतकरी प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
विरोधकांनी फडणवीस सरकारवर “फसणवीस सरकार” असा आरोप करत विविध बॅनर दाखवत तीव्र नाराजी व्यक्त केली. “सोयाबीनला नाही भाव, सत्तेसाठी महायुतीची धावाधाव”, “अर्थमंत्र्यांच्या खिशात पैसाच नाही”, “फडणवीसांचं पॅकेज फसवंच आहे” अशा घोषणाही देण्यात आल्या.
कर्जमाफी, कापसाला भाव, सोयाबीनसाठी योग्य दर अशी मागणी विरोधकांनी जोरदारपणे केली. “सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी” म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. या आंदोलनात आमदार विजय वडेट्टीवार, शशिकांत शिंदे, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सुनील प्रभू, सचिन अहिर, सतेज पाटील, अस्लम शेख आदी नेते उपस्थित होते.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरीही सरकार फक्त घोषणा करत आहे. कापूस आयात केल्याने भाव आणखी पडतील आणि शेतकरी बिकट परिस्थितीत सापडेल. धानाला, सोयाबीनला योग्य दर नाही; प्रतिक्विंटल फक्त चार हजार रुपयांवर सरकारचे समाधान आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.